जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णसंख्येने 21 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाचा निष्काळजीपणा विद्यार्थ्यांना चांगलाच भारी पडला आहे. अमेरिकेत शिक्षकामुळे विद्यार्थ्यांसह 26 जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या संशोधकांनी माहिती दिली आहे.
कॅलिफोर्नियाच्या प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली होती. त्या शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांसह एकूण 26 जणांना आता कोरोनाची लागण झाली आहे. शिक्षकाने कोरोनाची लक्षणं असूनही मुलांना शिकवलं. सीडीसीने त्यामुळे प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण गरजेचं आहे, हे अनेकदा पुराव्यांमधून स्पष्ट झालं आहे. तसेच शाळेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्क्रीनिंग करणं, सुरक्षित अंतर पाळणं आवश्यक आहे असं म्हटलं आहे. सीडीसीच्या संशोधकांनी आता शाळांमध्ये लसीकरणाच्या आदेशाची मागणी केली आहे.
शिक्षकामुळे सुरुवातीला वर्गात पहिल्या रांगेत बसणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपैकी 8 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आणखी एका इयत्तेतील मुलांना देखील लागण झाल्याचं समोर आलं. मुलांमुळे काही पालकांना देखील संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदा वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज 1 लाख नवे रुग्ण; शवागृहात मृतदेहांचा खच, परिस्थिती गंभीर
एका दिवसात कोरोनाचे तब्बल 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, मध्य फ्लोरिडामध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेहांसाठी जागाच शिल्लक नाही. शवागृहात मृतदेहांचा खच पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्लोरिडामध्ये सर्वाधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रांतात सध्या 17 हजारांहून अधिक रुग्ण भरती आहेत. अमेरिकेतील वाढत्या रुग्णसंख्येने रेकॉर्ड केला आहे. मृतांचा आकडा तर सातत्याने वाढत आहे. यासाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सहा लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.