युरियाच्या किमती वाढणार नाहीत - सरकार
By admin | Published: June 12, 2014 6:55 PM
नवी दिल्ली- युरिया खताच्या किमती वाढविण्याचा सरकारचा विचार नाही, युरियाच्या किमती सध्या आहेत त्याच राहतील, असे खतमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले. युरिया हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे, तसेच सरकारी नियंत्रण असणारे एकमेव खत आहे. दर टनाला ५,३६० रु. ही त्याची निर्धारित किंमत आहे. सध्या तरी युरिया खताची हीच किंमत कायम ठेवली जाईल.
नवी दिल्ली- युरिया खताच्या किमती वाढविण्याचा सरकारचा विचार नाही, युरियाच्या किमती सध्या आहेत त्याच राहतील, असे खतमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले. युरिया हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे, तसेच सरकारी नियंत्रण असणारे एकमेव खत आहे. दर टनाला ५,३६० रु. ही त्याची निर्धारित किंमत आहे. सध्या तरी युरिया खताची हीच किंमत कायम ठेवली जाईल. या आठवड्याच्या सुरुवातीला एका ज्येष्ठ अधिकार्याने युरियाच्या किमती वाढविण्याचा विचार चालू असल्याचे सांगितले होते, त्यानंतर खतांच्या शेअरचे भावही वाढले होते; पण सरकारने आज आपली भूमिका स्पष्ट केली असून, किंमत सध्याचीच राहील, असे म्हटले आहे. युरियाचा उत्पादन खर्च खत समन्वय समितीकडून ठरविला जातो व विक्रीच्या किमतीतील फरक ही सरकारची सबसिडी असते. १ जुलैपर्यंत नैसर्गिक गॅस दरवाढीचा निर्णय घेण्यात येणार असून, गॅसदर दुप्पट झाल्यास युरिया खताच्या किमतीत थोडीफार वाढ करावी लागणार आहे. प्रति दर ब्रिटिश थर्मल युनिट गॅसचा दर १ डॉलरने वाढल्यास सरकारवरील सबसिडीचा बोजा ४०६ दशलक्ष डॉलर (२३९५ कोटी रु.) ने वाढणार आहे. खतनिर्मिती कारखाने हे नैसर्गिक गॅसचे मोठे ग्राहक असतात. या कारखान्यांना दररोज ३१.५ दशलक्ष घनमीटर इंधन लागते. युरियाच्या किमतीत ६५ टक्के वाटा नैसर्गिक गॅसचा असतो. अंतरिम बजेटमध्ये युरियाची सबसिडी गेल्या वर्षाइतकीच ठेवण्यात आली होती. २००७-०८ पासून युरियाचे उत्पादन २२ दशलक्ष टन कायम राहिले आहेत; पण युरियाची मागणी ३० दशलक्ष टनाची असून, राहिलेले खत आयात केले जाते.