ऑनलाइ लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ : काश्मीरची दहशतवादी राज्य म्हणून झालेली ओळख लपविण्यासाठीच भारताकडून जगाची दिशाभूल सुरू आहे, असा अजब दावा पाकिस्तानने केला आहे. उरी हल्ल्यानंतरच्या भारताच्या कडवट आणि निराधार आरोपातून हेच सिद्ध होते, असा जावईशोधही पाकिस्तानने लावला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विदेश विभागाचे सल्लागार सरताज अजीज यांनी हे मत व्यक्त केले आहे. सरताज अजीज म्हणाले की, उरी हल्ल्यानंतर भारताकडून आलेल्या प्रतिक्रिया आम्ही गांभीर्याने घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेले निराधार आणि बेजबाबदार आरोप पाकिस्तानने फेटाळले आहेत.
हिज्बुलचा कमांडर बुऱ्हाण वाणी याच्या मृत्यूनंतर झपाट्याने बिघडणाऱ्या काश्मिरातील मानवाधिकारांच्या स्थितीपासून लक्ष विचलित करण्याचा भारताचा हा प्रयत्न आहे. अजीज म्हणाले की, काश्मिरातील परिस्थिती पाकिस्तानने तयार केलेली नाही. अवैध भारतीय कब्जा आणि अत्याचाराच्या दीर्घ इतिहासाने काश्मिरात हजारो नागरिकांचे बळी गेलेले आहेत. सरकारी बळाचा वापर करून महिला, मुले, हॉस्पिटलमधील जखमी, वृद्ध यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाने आता जागे व्हायला हवे. दरम्यान, पाकिस्तान दहशतवादी देश आहे, या राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर बोलताना अजीज म्हणाले की, चौकशीपूर्वीच पाकिस्तानला दोष देणे निंदनीय आहे. व्हेनेझुएला येथे होत असलेल्या अलिप्तवादी गटांच्या शिखर संमेलनात पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत असलेले अजीज म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या घोषणापत्रानुसार काश्मीर मुद्यावर तोडगा काढल्याशिवाय दक्षिण आशियात शांतता स्थापन होणार नाही.