ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे. काश्मिरमधल्या मुस्लीमांच्या लढ्याला शीखांनी पाठिंबा देऊ नये म्हणून शीखांचं प्राबल्य असलेल्या उरीची खोट्या दहशतवादी हल्ल्यासाठी निवड करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे.
पाकिस्तानमधल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी शीखांचा स्वतंत्र काश्मिर मागणाऱ्या मुस्लीमांना पाठिंबा असल्याचे सांगत हिंदूंचा वरचश्मा असलेल्या सरकारनं शीख व मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा बनाव रचल्याचा हास्यास्पद कांगावा केला आहे.
काश्मिरमधला हिंसाचार लपवणे, पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप करणे, शीख व मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करणे आणि नवाझ शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्रातील संदेशाचं महत्त्व कमी करणे असे अनेक पक्षी एका दगडात मारण्याचा प्रयत्न घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यातून भारत करत असल्याचं या सुरक्षा अधिकाऱ्याने दी न्यूज इंटरनॅशलला सांगितलं आहे.
आणखी वाचा
जर, भारताने नियंत्रणरेषेवर कुंपण घातले आहे आणि लेझर सेन्सर बसवले आहेत, तर सीमेपलिकडून घुसखोरी होऊच कशी शकेल असा सवालही या वृत्तपत्रात विचारण्यात आला आहे. जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या व अत्याधुनिक उपकरणे असलेल्या भारतीय लष्कराला चकमा देऊन मूठभर दहशतवादी असा हल्ला घडवूच कसा शकतात अशी खिल्लीही उडवण्यात आली आहे.