वॉशिंग्टन - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने आठ कोटींचा टप्पा पार केला असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान अमेरिकेतील नवनिर्वाचित खासदाराला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी ते शपथ घेणार होते. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आहे. ल्यूक जोशुआ लेटलो असं रिपब्लिकन खासदाराचं नाव होतं. 18 डिसेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
ल्यूक जोशुआ लेटलो यांनी 18 डिसेंबरला आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. उत्तर लुसियानातील रिचलँड पॅरिशमधील आपल्या घरात ते आयसोलेट झाले होते. पण 19 डिसेंबरला त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. याच दरम्यान त्यांची तब्येत कोरोनामुळे आणखी गंभीर झाली. त्यानंतर 23 डिसेंबरला त्यांना श्रेवेपोर्टमधील एका रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 41 व्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यामागे त्यांची पत्नी जुलिया बरनहिल लेटलो आणि दोन लहान मुलं आहेत.
लुसियानामध्ये कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती खूप बिघडली आहे. लेटलो स्वतः सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करण्याचं वारंवार सांगायचे. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते बहुतेक वेळा मास्क न घालताच दिसले. निवडणूक प्रचारात ते कधी मास्क घालायचे तर कधी नाही. ऑक्टोबरमध्ये एका कँडिडेट फोरमनं त्यांना अर्थव्यवस्था ढासळल्याचं सांगितलं तेव्हा सर्व प्रतिबंध हटवण्याचंही त्यांनी समर्थन केलं होतं. लेटलो हे अमेरिकेतील राजकारणातील उच्च नेते होते. लुइसियानाचे गव्हर्नर जॉनल बेल एडवर्ड्स यांनीही ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी घेतली कोरोना लस
कोरोनाच्या महामारीत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोना पुढे हतबल झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक असून मृतांचा आकडाही सातत्याने वाढत आहे. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Kamla Harris) यांनी मंगळवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. याचं टीव्हीवरून थेट प्रक्षेपणही करण्यात आलं.
अमेरिकेत कोरोना लसीसंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्याचे साईड इफेक्ट देखील समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रतिष्ठित व्यक्ती लस टोचून घेत आहेत. कोरोना लस टोचून घेण्यासाठी अमेरिकी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी हे करण्यात येत आहे. साउथईस्ट वॉशिंग्टनमधील मेडिकल सेंटरमध्ये कमला हॅरिस यांनी कोरोना लसीचा डोस घेतला. "मला काहीच त्रास झाला नाही. ही लस सुरक्षित आहे. आपलं रक्षण करते आणि ती घेताना फारसं दुखतही नाही, त्यामुळे प्रत्येकाने ही लस घ्यावी असं मी आवाहन करते" असं कमला हॅरिस यांनी म्हटलं आहे.