उटाह - एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरला टिप दिली जाते. मात्र टिपमुळे जर कोणी लखपती झालं असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. पिझ्झा डिलिव्हरीसाठी एका आजोबांना तब्बल 9 लाखांची टिप मिळाली आहे. यामुळे आजोबा काही क्षणांत लखपती झाले आहेत. 89 वर्षीय डेरलिन नीवी यांना पिझ्झा डिलिव्हरीसाठी तब्बल 12000 डॉलर्स म्हणजे 9 लाख रुपये टिप मिळाली आहे. डेरलिन नीवी अमेरिकेच्या उटाहमध्ये पापा जोन्स ब्रँडच्या पिझ्झाच्या डिलिव्हरीचं काम करतात.
डेरलिन आठवडाभर जवळपास 30 तास पिझ्झा डिलिव्हरीचं करतात. काही आठवड्यांपूर्वी ते ग्लॅडी वाल्डेज यांच्या घरी पिझ्झा घेऊन गेले. ग्लॅडीने दरवाजा उघडताच डेरलिन यांनी त्यांना हाय गॉर्जस असं म्हटलं. ग्लॅडीचं कौतुकही केलं. ग्लॅडीला हे खूपच आवडलं. ग्लॅडीने आपला पती कार्लोस वाल्डेजला या डिलिव्हरी मॅनबाबत सांगितलं. कार्लोस यांना डेरलिन यांचा स्वभाव आणि प्रामाणिकपणा फार जास्त आवडला. त्यासोबत ते या वयातही पिझ्झा डिलिव्हरीसारखं काम करत आहेत याचं कौतुक वाटलं.
डेरलिन डिलिव्हरीसाठी आले तेव्हा तेव्हा वाल्डेज कुटुंबाने पोस्ट केला व्हिडीओ
कार्लोस यांनी आपल्या दरवाजाजवळ असलेल्या कॅमेऱ्याच्या फुटेजमधील डेरलिन यांचा व्हिडीओ आपल्या टिकटॉकवर पोस्ट केला. त्यांच्या फॉलोअर्सनादेखील डेरलिन आवडले. डेरलिनसाठी हजारो मेसेज आले. वाल्डेज कुटुंबाने यानंतर कित्येक वेळा पिझ्झा ऑर्डर केला आणि त्यांनी डिलिव्हरीसाठी डेरलिन यांनाच पाठवावं यावर जोर दिला. जेव्हा जेव्हा डेरलिन डिलिव्हरीसाठी आले तेव्हा तेव्हा वाल्डेज कुटुंबाने त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला.
फक्त 24 तासांतच एक हजार डॉलरपेक्षा अधिक पैसे जमा
कार्लोस वाल्डेज यांना या डिलिव्हरी बॉयसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या टिकटॉक पेजवर क्राऊड फंडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. फक्त 24 तासांतच एक हजार डॉलरपेक्षा अधिक पैसे जमा झाले. एकूण 12 हजार डॉलर्स जमा झाले. त्यानंतर वाल्डेज स्वत: त्यांच्या घरी गेले आणि एका रिकाम्या पिझ्झा बॉक्समधून 12000 डॉलर दिले. पिझ्झाचा बॉक्स उघडताच डेरलिन यांच्या डोळ्यात पाणी आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.