बगदाद - अमेरिकेकडून पुन्हा इराकवर हवाई हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (4 जानेवारी) उत्तरी बगदादमध्ये हा हल्ला करण्यात आला असून जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या हवाई हल्ल्यात इराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबीच्या काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हश्द अल शाबी हा इराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे. बगदादमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे या वाहनातून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जळून मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात हश्द अल शाबीच्या एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने शुक्रवारी (3 जानेवारी) हवाई हल्ला करून इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला ठार केले आहे. मेजर जनरल कासिम सुलेमानी असे या अधिकाऱ्याचे नाव असून इराणच्या कद्स फोर्सचे ते प्रमुख होते. सुलेमानी यांच्या वाहनांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. अनेक सैनिक जखमी झाले आहेत. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता.
अमेरिकेने इराणच्या लष्कर प्रमुख पदाचा अधिकारी कासिम सुलेमानीला बगदाद विमानतळावर हवाई हल्ला करून ठार केले. यामुळे इराण संतप्त झाला असून जग युद्धाच्या खाईत लोटले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेने केलेला हा हल्ला भ्याड असून दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया इराणकडून आली आहे. तर अमेरिकेतही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अमेरिका- इराणदरम्यान तणावाचे वातावरण गेल्या दोन वर्षांपासून आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बगदादच्या अमेरिकन दुतावासावर इराणच्या पुरस्कृत संघटनेने हल्ला चढविला होता. याचा बदला म्हणून अमेरिकेने गेल्या चार दशकांपासून हवा असलेल्या सुलेमानीचा खात्मा केला आहे. यामुळे पश्चिम आशियातील वातावरण संतप्त झाले असून इंधनाच्या किंमतीही वाढल्या आहेत. सुलेमानीच्या मृत्यूच्या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किंमतींमध्ये 1.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक बॅरलची किंमत 67.12 डॉलरवर पोहोचली आहे. तर अमेरिकन क्रूडच्या किंमतीतही 1.24 टक्क्यांची वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सोनिया गांधींचा हिरवा कंदील, काँग्रेस मंत्र्यांना 'या' 10 खात्यांची लॉटरी
अमेरिकेकडून पुन्हा इराकवर हवाई हल्ला, 6 जणांचा मृत्यू
CAA : केरळच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंसह 11 मुख्यमंत्र्यांना पत्र
मोदी सरकार जिल्हा सरकारी रुग्णालयं देणार खासगी संस्थांच्या हाती?
वृद्धाची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारीच गाडीपर्यंत येतात तेव्हा...