वॉशिंग्टन- अमेरिका आणि तुर्कस्थान यांच्यामधील संबंध दिवसेंदिवस अधिकच तणावाचे होत चालले आहेत. दोन्ही देशांमदील व्यापारी संबंधांमध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण नोंदवली गेली. अनेक चांगल्या कंपन्यांच्या समभागांना या घसरणीचा सामना करावा लागला. शुक्रवारी युरोपातील शेअरबाजारावरही तुर्कस्थान प्रश्नाचा परिणाम दिसून आला.तुर्कस्थानचे लिरा हे चलन झपाट्याने कोसळले असून डॉलरच्या तुलनेत गेल्या वर्षभरात लिराची 50 टक्के घसरण झाली आहे. लिराचे मुल्य वाचवण्यासाठी तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी आपल्या देशातील व्यापाऱ्यांना डॉलरचा त्याग करण्याची विनंती केली. त्यामुळे 300 तुर्की व्यापाऱ्यांनी आपल्याकडील 30 लाख डॉलरचे लिरामध्ये रुपांतर करुन घेतले.गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल़्ड ट्रम्प यांनी तुर्कस्थानातून येणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात शुल्क वाढवण्याचे आदेश दिले होते. तसे केल्यावर तुर्कस्थानने अमेरिकेतून येणाऱ्या अल्कोहोल, तंबाखू, चारचाकी गाड्यांसारख्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले.या सर्व घडामोडींचा अमेरिकेच्या शेअरबाजारावर नकारात्मक परिणाम दिसून आला असून सोमवारच्या तुलनेत गुरुवारी डाओ जोन्स हा निर्देशांक कोसळल्याचे दिसून आले. तुर्कस्थान आणि अमेरिका यांच्यामध्ये गेली 60 वर्षे व्यापारी संबंध आहेत. त्याचप्रमाणए दोन्ही देश नाटोचे सदस्य आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाचा परिणाम आपल्या गुंतवणुकीवर होईल अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे.लिराचा दर का घसरला? हे जाणून घेण्यासाठी पुढील मुद्द्यांचा विचार करता येईल.1) तुर्कस्थानातील राजकीय आणि आर्थिक प्रश्नांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असून त्यामुळे चलनवाढ झाली आहे. तुर्कस्थानच्या तिजोरीतील परदेशी चलनाचा साठाही कमी होत चालला आहे.
2) जुलै महिन्यामध्ये तुर्कस्थानात चलनवाढीचा दर 16 टक्क्यांवर पोहोचला असून परदेशी कर्जांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे वित्तिय तूटही वाढल्यामुळे अर्थव्यवस्था अधिकाधिक नाजूक होत चालली आहे.
3) तुर्कस्थानामध्ये अमेरिकन ख्रिश्चन धर्मगुरु आणि , नासाचे वैज्ञानिक आणि अमेरिकन वाणिज्यदुतावासात काम करणारे काही तुर्की नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. या लोकांनी तुर्कस्थानात झालेल्या लष्करी बंडाला मदत केल्याचा आरोप केला आहे. मात्र अमेरिकन नागरिकांना तात्काळ सोडावे यासाठी अमेरिकेने वारंवार मागणी केली आहे. या लोकांना सोडण्यासाठी करण्यात येणारा करार अंतिम टप्प्यात आला असतानाच बोलणी फिस्कटली. त्यावर अमेरिकेने तुर्कस्थानावर निर्बंध लादण्याचे जाहीर केले. यामुळे तुर्कस्थानचे चलन अधिकच घसरले.
4) तुर्कस्थानामध्ये मध्यवर्ती बँकेतील कामकाजात सरकारचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होतो. मध्यवर्ती बँकेवर अध्यक्ष म्हणून तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी आपल्या अर्थमंत्र्यांच्या जावयाला नेमले आहे. त्यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
5) तुर्कस्थानने स्पॅनिश बँकांकडून 83.3 अब्ज डॉलर, फ्रेंच बँकांकडून 38.4 अब्ज डॉलर, इटालियन बँकांकडून 17 अब्ज डॉलर, जपानच्या बँकांकडून 14 अब्ज डॉलर, ब्रिटिश बँकांकडून 19.2 आणि अमेरिकेकडून 18 अब्ज डॉलरचे कर्ज घेतलेले आहे.