ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 3 - इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीवर अमेरिका भडकला असून, त्यांनी 13 नागरिक आणि इराणमधल्या डझनांहून अधिक कंपन्यांवर प्रतिबंध लादले आहेत. ट्रम्प सरकारनं या कंपन्यांवर निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. इराणवर दबाव टाकण्याच्या दृष्टीनं अमेरिकेनं हे निर्बंध लादल्याची चर्चा आहे. निर्बंध घातलेल्या लोकांमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकत घेणा-या कंपन्या, एजंट्स आणि इराणच्या लोकांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच इराणवर कडक निर्बंध घालण्याचे सूतोवाच केले होते. अमेरिकेनं घातलेल्या निर्बंधांमुळे क्षेपणास्त्राशी संबंधित तंत्रज्ञान इराणला इतर देशांकडून घेता येणार नाही. इराणी, लेबनीज, चीन आणि अमिरातीच्या कंपन्यांवरही अमेरिका आणि अमेरिकन नागरिकांशी व्यवसाय करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाचे प्रमुख जॉन इ स्मिथ यांनी दिली आहे. ते म्हणाले, इराणने दहशतवाद आणि स्वतःच्या बॅलिस्टिक मिसाइल कार्यक्रमाला समर्थन देणं सुरूच ठेवलं आहे. त्यामुळे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना धोका उद्भवू शकतो. आम्ही सर्व शक्यतांची चाचपणी करून इराणवर दबाव आणू, त्यात इराणवर आर्थिक निर्बंधही लादले जातील. तत्पूर्वी ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लीन यांनीही येमेनमध्ये बंडखोरांना समर्थन देण्यावर इराणला नोटीस बजावली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी इराणला ट्विट करून इशाराही दिला होता. इराण आगीशी खेळत आहे. ओबामांनी इराणवरील निर्बंध उठवले, मात्र इराण कृतघ्न निघाला, मला तसे समजू नका, असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
Iran is playing with fire - they don't appreciate how "kind" President Obama was to them. Not me!— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 3, 2017