वॉशिंग्टन : अमेरिकी लष्कराने इराकमधील इस्लामिक स्टेट (आयएस) दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लढाऊ विमाने आणि ड्रोनद्वारे हवाई हल्ले केले. देशाचे सर्वात मोठे धरण दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करून त्यावर पुन्हा ताबा मिळविण्यासह कुर्दिश सैन्याला मदत करण्याच्या उद्देशाने कुर्दची राजधानी इरबिलजवळ हे हल्ले करण्यात आले. अमेरिकी लढाऊ विमाने आणि मानवरहित विमानांनी इरबिल व मोसूलच्या धरणांजवळ यशस्वीरीत्या हल्ले केले, असे अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागनने म्हटले आहे. इराकमधील मानवीय मदतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी आणि अमेरिकी कर्मचारी तसेच प्रतिष्ठानांच्या सुरक्षेसाठी हे हल्ले करण्यात आल्याचे पेंटागनने स्पष्ट केले. आतापर्यंत करण्यात आलेल्या नऊ हल्ल्यांत अतिरेक्यांना घेऊन जात असलेली चार वाहने, सात सशस्त्र वाहने व एक चिलखती वाहन नष्ट करण्यात आले. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी उत्तर इराकमध्ये तिरगिस नदीवर असलेल्या मोसूल धरणावर ताबा मिळविला होता. या धरणाद्वारे संपूर्ण क्षेत्राला विजेचा पुरवठा केला जातो. तद्वतच नीनेवा प्रांतातील सिंचनासाठी त्याची खूप उपयुक्तता आहे. या धरणावर पुन्हा ताबा मिळविणे दहशतवाद्यांविरुद्धच्या इराकी सुरक्षा दलांच्या लढाईतील मोठे यश असेल. (वृत्तसंस्था)
अमेरिकेचे इराकमध्ये अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर हल्ले
By admin | Published: August 18, 2014 3:22 AM