ऑनलाइन टीम
वॉशिंग्टन, दि. ८ - इराकमधील दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी इराकवर हवाई हल्ला करण्याचा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे. त्यानंतर इरबिल या कुर्द प्रांताच्या राजधानीला ISIS या सुन्नी इस्लामी दहशतवाद्यांपासून वाचवण्यासाठी तसेच या प्रांतात अडकलेल्या लाखो अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या विमानांनी दहशतवाद्यांवरील हल्ल्यांना सुरुवात केल्याचे पेंटॅगॉनने सांगितले आहे.
इराकमधील हिंसाचार थोपवण्यासाठी अमेरिकेने अखेर हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला असून दहशतवाद्यांच्या ताब्यातील भागावर हल्ला करण्याची परवानगी ओबामा यांनी सैन्याला दिली आहे. तसेच, दहशतवाद्यांचे लक्ष्यस्थान बनलेल्या इराकमधील अल्पसंख्यांकांसाठी मदत पाठविण्याचेही निर्देश ओबामांनी सैन्यास दिले आहेत. 'व्हाईट हाऊस'मधून ओबामांनी ही घोषणा केली.
इराकमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना वाचवण्यासाठी ओबामांनी ही परवानगी दिली आहे. आयएसआयएसच्या (ISIS) दहशतवाद्यांनी इरबिल शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्यास, कारवाई होईल, असे त्यांनी म्हटले आहे. इरबिलमध्ये अमेरिकेचे दूतावास व सैन्य सल्लागारांचे कार्यालय आहे. दरम्यान, इराकमध्ये हवाई हल्ल्यास परवानगी दिली असली, तरी या भागात अमेरिका पुन्हा सैन्य उतरवणार नाही, असे ओबामांनी यावेळी स्पष्ट केले.
इराकचा बहुसंख्य भाग हा आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतला असून त्यांनी अनेक दिवसांपासून इराकमध्ये थैमान घातले आहे, ज्यात आत्तापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.