वॉशिंग्टन : इराक व सिरियामधील दहशतवाद्यांशी संबंधित ८३ ठिकाणांवर अमेरिकेच्या लष्कराने हवाई हल्ले केले. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड व त्यांचा पाठिंबा असलेल्या दहशतवादी संघटनांनी गेल्या रविवारी जॉर्डन येथील अमेरिकी तळावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता अमेरिकेने शुक्रवारी प्रतिहल्ले केले.
जॉर्डन येथील तळावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. आम्ही एकदा हल्ला करून थांबणार नाही तर अनेक हल्ले केले जातील, असेही त्यांनी म्हटले होते. दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणे उद्ध्वस्त केली जातील, असेही ते म्हणाले होते. हल्ल्यांमध्ये इराक व सिरियातील दहशतवाद्यांच्या तळांचे किती नुकसान झाले, याचा तपशील उपलब्ध झालेला नाही. मात्र, दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या रविवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकेच्या तीन सैनिकांचा मृत्यू झाला होता व ४० सैनिक जखमी झाले होते.(वृत्तसंस्था)