नवी दिल्ली - भारत(India) आणि अमेरिका(America) यांच्यातील मैत्रीचे संबंध आणखी घट्ट झाले आहेत. अमेरिका आता चीनच्या तुलनेत भारताला जास्त महत्त्व देत आहे. विशेष म्हणजे आर्थिक व्यवहारात अमेरिका आणि भारत एकमेकांचे मजबूत भागीदार बनले आहेत. मागील आर्थिक वर्षात अमेरिकेचे चीनपेक्षा जास्त भारतासोबत व्यापार झाला आहे. याचा थेट अर्थ असा की अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यावसायिक संबंध आणखी घट्ट झाले आहेत.
अमेरिकेच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारत दुसरा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार बनला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध मजबूत झाले आहेत. भारतासोबत व्यापारात अमेरिकेने चीनलाही मागे टाकलं आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये अमेरिका-भारत द्विपक्षीय व्यापार वाढून ११९.४२ अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे जो सन २०२०-२१ मध्ये ८०.५१ अब्ज डॉलर इतका होता.
तसेच २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताचं अमेरिकेला निर्यात वाढून ७६.११ अब्ज डॉलर इतके झाले आहे. जे मागील वर्षी ५१.६२ अब्ज डॉलर होतं. त्याचसोबत अमेरिकेतून भारतात आयात वाढून ४३.३१ अब्ज डॉलरवर पोहचले आहे. जे मागील आर्थिक वर्षात २९ अब्ज डॉलर इतके होते. भारत-चीन यांच्यात द्विपक्षीय व्यापार ११५.४२ अब्ज डॉलर आहे जो २०२०-२१ या वर्षात ८६.४ अब्ज डॉलर होतं. उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, आगामी काही वर्षात भारत अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध आणखी वाढतील आणि दोन्ही देशांना आर्थिक फायदा होईल.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) चे उपाध्यक्ष खालिद खान म्हणाले की, भारत एक विश्वासार्ह व्यापारी भागीदार म्हणून उदयास येत आहे आणि जागतिक कंपन्या चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करत आहेत. जागतिक कंपन्या भारत आणि इतर देशांमध्ये त्यांच्या व्यवसायात विविधता आणत आहेत. ते म्हणाले, 'भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार येत्या काही वर्षांत आणखी वाढेल. भारत अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPEF) उपक्रमात सामील झाला आहे. यामुळे आर्थिक संबंध अधिक दृढ होतील. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट (IIPM), बेंगळुरूचे संचालक राकेश मोहन जोशी म्हणाले की, भारत १.३९ अब्ज लोकसंख्येसह जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ आहे. वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे अमेरिका आणि भारतातील कंपन्यांना तंत्रज्ञान व्यवहार, उत्पादन, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी भरपूर संधी आहेत.