काही दिवसांपूर्वी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन यांनी विजय मिळवला. २० जनेवारी रोजी बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची तर कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ऊर्जा आणि हवामान बदलांच्या वरिष्ठ सल्लागापदी सोनिया अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे. सोनिया अग्रवाल यांच्याव्यतिरिक्त बायडेन यांनी अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांना संधी दिली आहे. यापूर्वीही सोनिया अग्रवाल यांनी बायडेन उपराष्ट्राध्यक्ष असताना ऊर्जा विषयांत त्यांच्यासोबत मोलाची भूमिका बजावली होती. सोनिया अग्रवाल या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म ओहियोमध्ये झाला. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. बायडेन यांच्या प्रशासनात स्थान मिळालेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये कमला हॅरिस यांचंही नाव आहे. त्यादेखील २० जानेवारी रोजी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. याव्यतिरिक्त निरा टंडन या कॅबिनेट रँकसह व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प कार्यालयाच्या संचालक म्हणून काम पाहणार आहेत. विवेक मूर्ती सर्जन जनरल, वेदांत पटेल सहाय्यक माध्यम सचिव, विनय रेड्डी भाषण लेखन संचालक आणि गौतम राघवन हे राष्ट्रपती कार्यालयाचे उपसंचालक म्हणून कार्यरत असणार आहेत. यांच्याव्यतिरिक्त बायडेन प्रशासनात स्थान मिळालेल्यांपैकी अतुल गवांडे, सेलीन गौंडर हे कोविड-१९ टास्क फोर्स सदस्य, भरत राममूर्ती राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक, सबरिना सिंह यांच्याकडे कमला हॅरिस यांच्या उप माध्यम सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माला बाया अदिगा यांच्याकडे जिल बायडेन यांच्या धोरण संचालक पदाची, शपथविधी सोहळ्याच्या आयोजन समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी माजू वर्गिस यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दुसरीकडे तरूण छाब्रा, सुमोना गुहा यांनादेखील ट्रम्प प्रशासनात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.
सोनिया अग्रवाल बायडेन यांच्या हवामान बदल विषयांच्या सल्लागार; अनेक भारतीयांना मोठं स्थान
By जयदीप दाभोळकर | Updated: January 15, 2021 13:11 IST
अनेक भारतीयांना मिळाली मोठी जबाबदारी, २० जानेवारी रोजी बायडेन यांचा शपथविधी
सोनिया अग्रवाल बायडेन यांच्या हवामान बदल विषयांच्या सल्लागार; अनेक भारतीयांना मोठं स्थान
ठळक मुद्दे२० जानेवारी रोजी बायडेन यांचा शपथविधीकमला हॅरिसदेखील घेणार उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ