वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनसह देशाच्या पूर्व भागाला भीषण हिमवादळाचा तडाखा बसला असून वादळाशी संबंधित दुर्घटना आठजण मृत्युमूखी पडले आहेत. ३० इंच एवढा विक्रमी हिमवर्षाव होण्याची शक्यता असल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या वादळामुळे एक लाख २० हजार घरांचा विद्युत पुरवठा खंडित होण्यासह अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या थंड वादळाचा वॉशिंग्टनशिवाय उत्तर कॅरोलिना, टेनेसी, मेरीलॅण्ड, वर्जिनिया, फिलाडेल्फिया, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क या राज्यांनाही तडाखा बसला असून जोरदार हिमवर्षावामुळे बर्फाची जाड चादर पसरली आहे. हिमवर्षावाच्या जोडीला सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली. येत्या दोन दिवसांत विक्रमी ३० इंच हिमवर्षावाची शक्यता असल्यामुळे वॉशिंग्टन डीसी आणि या भागातील इतर दहा राज्यांत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. प्रचंड हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. गेल्या ९० वर्षांत आम्ही एवढ्या प्रचंड हिमवृष्टीचे भाकित केले नव्हते. हा जीवन आणि मृत्यूचा प्रश्न असून कोलंबियाच्या सर्व रहिवाशांनी हिमवादळाबाबतचा इशारा तेवढ्याच गांभीर्याने घ्यावा, असे वॉशिंग्टनच्या महापौर एम. ई. बाऊजर यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीची शक्यता असल्यामुळे डिस्ट्रिक्ट नॅशनल गार्डस् तैनात करण्यात आले आहेत. प्रचंड हिमवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दृश्यमानता कमी होऊन प्रवास करणे धोकादायक बनेल. हे वादळ ३६ तासांपर्यंत सुरू राहू शकते व काही ठिकाणी दोन फुटांहून अधिक हिमवर्षाव होऊ शकतो, असे राष्ट्रीय हवामान सेवेने म्हटले आहे. या वादळाचे खरे स्वरूप मध्यरात्रीपर्यंत कळेल, असे टष्ट्वीटही या सेवेने केले आहे. मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी, सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळण्याचा धोका आहे. वादळामुळे शुक्रवारी सायंकाळी अनेक रस्ते अपघात घडले, असे व्हर्जिनियाच्या स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. घराबाहेरील तापमान शून्याखाली गेल्यामुळे बहुतांश लोकांनी घरातच थांबणे पसंत केले. स्थानिक प्रशासनाने मोठे रस्ते आणि महामार्गांवरील बर्फ हटविण्यासाठी बर्फ हटविणारी वाहने आणि मिठाच्या ट्रक्सची व्यवस्था केली आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2016 2:34 AM