Donald Trump slams Canada : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता काबीज केल्यानंतर जगभरात टॅरिफ वॉरमुळे चिंतेचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर टॅरिफ लागू केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाले. हा टॅरिफ संघर्ष हळुहळू अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे, कॅनडाकडून प्रत्युत्तराची कारवाई केल्यानंतर, आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (18 मार्च) फॉक्स न्यूजला मुलाखत दिली. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, कॅनडा जगातील सर्वात वाईट देशांपैकी एक आहे. या देशाशी चर्चा करणे खूप कठीण आहे.
यावेळी ट्रम्प यांनी कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावरही निशाणा साधला. कॅनडाशी डील करणे खूप अवघड काम आहे. परंतु तेव्हा ट्रूडो होते. मी त्यांना 'गव्हर्नर ट्रूडो' म्हणायचो. त्यांचे लोक खूप वाईट होते आणि त्यांनी नेहमी सत्य लपवले, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.
पदभार स्वीकारण्यापूर्वीच कॅनडा निशाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू केला. मात्र, अमेरिकेची सत्ता हाती घेण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर टीका सुरू केली होती. ते कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य बनवण्याची धमकी सातत्याने देत आहेत. तर, कॅनडाच्या सरकारनेही ट्रम्प यांना वेळोवेळी योग्य प्रत्युत्तर दिले आहे.
कॅनडात यावर्षी निवडणूक कॅनडात जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मार्क कार्नी लिबरल पक्षाचे नेते आणि कॅनडाचे पंतप्रधान बनले. मुलाखतीदरम्यान फॉक्स न्यूजच्या होस्टने ट्रम्प यांना विचारले की, या वर्षी ऑक्टोबरमध्ये कॅनडामध्ये निवडणुका होणार आहेत, अशा परिस्थितीत अध्यक्ष ट्रम्पची धोरणे मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पक्षासाठी निवडणुकीत फायदेशीर ठरू शकतात का?
या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, कॅनडात कंझर्व्हेटिव्हऐवजी लिबरल्ससोबत काम करणे सोपे जाईल. मात्र, कॅनडाचा मुख्य विरोधी पक्ष ओपिनियन पोलमध्ये सातत्याने स्थान मिळवत आहे. ट्रम्प पुढे म्हणाले, मला वाटते की, लिबरल्ससोबत काम करणे खरोखर सोपे आहे. कदाचित ते ही निवडणूक जिंकतील, परंतु मला काही फरक पडत नाही.
कॅनडाचा ट्रम्प यांना इशाराकॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. कार्ने यांनी शपथविधीनंतर देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही कडक संदेश दिला. अमेरिकेकडून टॅरिफच्या धमकीवर मार्क कार्नी म्हणाले की, शुल्काचा सामना करणे ही त्यांची पहिली प्राथमिकता असेल. कॅनडासमोर ट्रम्प यांचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी वर्णन केले आहे. कार्नी यांनी कॅनेडियन वस्तूंवरील यूएस टॅरिफला अन्यायकारक म्हटले. पण, त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, त्यांचे सरकार एक दिवस दोन्ही देशांचे हितसंबंध वाढवण्यासाठी अमेरिकेसोबत एकत्र काम करेल.