US China Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत मंदिची परिस्थिती निर्माण झाली आहे. आशिया आणि युरोपमधील शेअर बाजारात तर मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अशातच, अमेरिकेच्या आयात शुल्काला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेवर 34 टक्के आयात शुल्क लादले आहे. चीनच्या या कृतीमुळे ट्रम्प यांनी चिनी आयातीवर 50 टक्के कर लादण्याची धमकी दिली. त्यावर आता चीनची प्रतिक्रिया आली आहे.
मंगळवारी (8 एप्रिल) चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जर अमेरिकेने चीन आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हितांकडे दुर्लक्ष करत व्यापार युद्ध छेडण्याचा प्रयत्न केला, तर चीन शेवटपर्यंत लढा देईल. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला इशारा दिला आहे की, जर चीनने अमेरिकन वस्तूंवर लादलेले अतिरिक्त कर मंगळवार (8 एप्रिल 2025) पर्यंत मागे घेतले नाहीत, तर ते बुधवारपर्यंत चिनी आयातीवर 50 टक्के कर लादले जातील.
ही अमेरिकेची दादागिरी...यावर चिनी प्रवक्त्यांनी म्हटले की, अमेरिकेच्या टॅरिफ गैरवापरामुळे विविध देशांच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे गंभीर उल्लंघन होत आहे. हे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाले आहे. ही अमेरिकेची आर्थिक गुंडगिरी असल्याची टीकाही चीनने केली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडूनही अमेरिकेचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.
चीनने अतिरिक्त शुल्क लादलेचीनच्या अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी (4 एप्रिल) सांगितले की, 10 एप्रिलपासून अमेरिकेतून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर 34 टक्के अतिरिक्त कर लादला जाईल. अमेरिकेच्या निर्णयामुळे केवळ अमेरिकेच्या हितसंबंधांनाच हानी पोहोचणार नाही, तर जागतिक आर्थिक वाढ आणि पुरवठा साखळीलाही धोका निर्माण होईल, असे म्हटले होते.