US China Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले 'टॅरिफ' युद्ध पेटण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेवर 84% टक्के टॅरिफ लादला आहे. याशिवाय चीनच्या जिनपिंग सरकारने 18 अमेरिकन कंपन्यांवर कठोर कारवाई केली आहे. चीनने बुधवारी 12 अमेरिकन कंपन्यांना त्यांच्या निर्यात नियंत्रण यादीत सामील केले, तर 6 अमेरिकन कंपन्यांना "अविश्वसनीय संस्था"(Unreliable Entity List) यादीत सामील केले.
चीनने का केली कारवाई?ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, या कंपन्यांवर तैवानला शस्त्रे विकल्याचा किंवा तेथे लष्करी तांत्रिक सहकार्य केल्याचा आरोप आहे. यामुळेच या 6 अमेरिकन कंपन्यांना "अविश्वसनीय संस्था" यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
कोणत्या आहेत त्या कंपन्या ?शील्ड एआय, इंक., सिएरा नेवाडा कॉर्पोरेशन, सायबरलक्स कॉर्पोरेशन, एज ऑटोनॉमी ऑपरेशन्स एलएलसी, ग्रुप डब्लू आणि हडसन टेक्नॉलॉजीज कंपनीचा समावेश आहे.
चीनने काय म्हटले?चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चीनच्या विरोधाला न जुमानता या कंपन्या तैवानला शस्त्रे विकत आहेत, ज्यामुळे चीनच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने असेही स्पष्ट केले की, चीनने नेहमीच राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचवणाऱ्या परदेशी कंपन्यांवरच कारवाई केली आहे. कायद्याचे पालन करणाऱ्या परदेशी कंपन्यांना काळजी करण्याची गरज नाही. चीन सरकार जगभरातील कंपन्यांचे स्वागत करते आणि त्यांना येथे गुंतवणूक करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी स्थिर आणि न्याय्य वातावरण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
काय आहे प्रकरण ?चीन तैवानला आपला अविभाज्य भाग मानतो आणि कोणत्याही देशाकडून तेथे लष्करी सहकार्य किंवा शस्त्रास्त्रांची विक्री आपल्या सुरक्षेसाठी धोका मानतो. अमेरिकेसह अनेक देश तैवानला लष्करी मदत देत आहेत, ज्यावर चीनने वारंवार आक्षेप घेतला आहे.