अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 03:38 PM2024-11-20T15:38:50+5:302024-11-20T15:39:17+5:30
युक्रेनमध्ये राहत असलेल्या अमेरिकी नागरिकांनी संभाव्य हवाई हल्ल्यांबाबत सावध राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकाही दहशतीत आली असून युद्धाला दोन वर्षे लोटली तरी युक्रेनमध्ये सुरु असलेला दुतावास तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे एकीकडे इस्रायल-इराण युद्ध पेटण्याची शक्यता असताना रशिया युक्रेवरही भयानक हल्ले चढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
युक्रेनमध्ये राहत असलेल्या अमेरिकी नागरिकांनी संभाव्य हवाई हल्ल्यांबाबत सावध राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुतीन यांनी युक्रेनकडून होत असलेल्या बॅलेस्टिक मिसाईल हल्ल्याला अण्वस्त्रांनी प्रत्यूत्तर देणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे रशिया युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करणार या शक्यतेने जगभरात खळबळ उडाली आहे.
जाणकारांनुसार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी बॅलेस्टिक मिसाईल हल्ला करून लक्ष्मण रेखा पार केली आहे. यामुळे युरोपचे देश अण्वस्त्र युद्धाच्या भीतीने खाण्याच्या वस्तू आणि अन्य गोष्टी गोळा करू लागले आहेत. तर रशिया N-Resistant मोबाइल बंकर बनविण्याच्या तयारीला लागला आहे.
महत्वाचे म्हणजे अमेरिकेनेच युक्रेनला ही बॅलेस्टिक मिसाईल फायर करण्याची परवानगी दिली होती. रशियाच्या आतपर्यंत हे हल्ले होणार होते. बायडेन यांच्या या निर्णयानंतर पुतीन भडकले आहेत. यावरून त्यांनी जर बॅलेस्टिक मिसाईल आली तर अण्वस्त्र हल्ले केले जातील असे म्हटले आहे.