वॉशिंग्टन : कर्जमर्यादा वाढविण्याबाबत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष केविन मॅक्कार्थी यांनी शनिवारी ‘तत्त्वतः करार’ केला. दोघांनी केंद्रीय खर्च आटोक्यात ठेवून संभाव्य दिवाळखोरीपासून अमेरिकेचे संरक्षण करण्यासाठी तडजोड करण्यास सहमती दर्शविली आहे.
तथापि, करारापर्यंत पोहोचण्यासाठी ठरवण्यात आलेल्या सवलती किंवा अटींमुळे डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन हे दोन्हीही पक्ष नाराज होण्याचा धोका आहे. पाच जूनच्या मुदतीपूर्वी संसदीय मंजुरीसाठी दोन्ही पक्षांनी या करारावर सहमत होणे गरजेचे आहे. राष्ट्राध्यक्ष व आपल्यात शनिवारी सायंकाळी दूरध्वनीवर चर्चा झाल्यानंतर करारासाठी सहमती झाली. अमेरिका व जागतिक अर्थव्यवस्थांना धोक्यात आणणारी ही राजकीय कोंडी फुटण्याची देश आणि जग आतुरतेने वाट पाहत होते, असे मॅक्कार्थी म्हणाले.