वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाही. रिपोर्ट्सनुसार, येथील ट्रान्झिट हबमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरात हल्लेखोर अजूनही सक्रिय असल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून लोकांना या परिसरातून लांब राहण्यास सांगितले जात आहे. (us defense department pentagon on lockdown after gunshots heard outside)
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ही घटना मेट्रो बस प्लॅटफॉर्मवर घडली. हे पेंटागॉनमध्ये येण्याचे मोठे प्रवेशद्वार आहे, येथून हजारो लोक येतात. पेंटागॉन फोर्स प्रोटेक्शन एजन्सीचे प्रवक्ते ख्रिस लेमॅन म्हणाले की, हा परिसर सुरक्षित नाही आणि लोकांनी दूर राहावे. मात्र, त्यांनी गोळीबाराच्या घटनेला अद्याप दुजोरा दिला नाही. तसेच, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे त्यांनी सांगितले नाही.
न्यूज एजन्सी असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टमध्ये आर्लिंगटन काउंटी फायर डिपार्टमेंटच्या हवाल्याने अमेरिकन लष्करी मुख्यालयाबाहेर अनेक लोक जखमी झाल्याचा दावा केला आहे. एजन्सीच्या पत्रकारांनी पोलिसांना 'शूटर'विषयी बोलताना ऐकले आहे, परंतु गोळीबाराची अधिकृतपणे माहिती दिली नाही.