वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी संघर्षरत इराकमध्ये सैनिक तैनात करण्यास नकार दिला आहे; पण त्याचवेळी अमेरिका ३०० लष्करी सल्लागार इराकमध्ये पाठविणार असून, इराकच्या सैन्याचे मनोबल वाढविण्याचे काम हे सल्लागार करतील.इराकमध्ये सरकारविरोधात लढणार्या बंडखोरांचा अभ्यास अमेरिका करत असून, तशी गुप्तचर माहिती गोळा केली जात आहे. या संघर्षाची स्थिती चिघळल्यास लक्ष्याचा वेध घेणारी लष्करी कारवाई अमेरिका करणार आहे. अध्यक्ष ओबामा यांनी इराकचे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांच्याबद्दल फारसे वक्तव्य केले नाही. शिया नेते असणारे मलिकी यांच्या पंथवादी धोरणामुळेच सध्याचा सुन्नी विरुद्ध शिया हा संघर्ष उभा राहिला आहे. इराकमधील संयुक्त सरकारचे नेतृत्व मलिकी करू शकत नाहीत, असा निष्कर्ष अमेरिकी अधिकारी काढत आहेत. इराकचा नेता निवडणे हे आमचे काम नाही, असे ओबामा यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे. सध्या संशय व अविश्वासाचे वातावरण असून, इराकी सरकारने सुन्नी अल्पसंख्याकांना एकाकी पाडले व त्याचे परिणाम आज इराक भोगत आहे, असे ओबामा म्हणाले. मलिकी यांना आपण हा संदेश जाहीरपणे दिला आहे, असे त्यांनी सांगितले.इराकच्या संघर्षातून राजकीय तोडगा निघू शकतो असा आपला विश्वास आहे, असे ओबामा यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी या आठवड्यात युरोप व मध्यपूर्वेत जात असून, इराकच्या शेजारी देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील.इराणचीही इराकला मदत होऊ शकते; पण इराणही शिया पंथाचा असून इराणने आपले सैन्य इराकमध्ये पाठविल्यास इराकचा विनाश होऊ शकतो, असे ओबामा यांनी म्हटले आहे. इराकमध्ये नागरी युद्ध भडकू नये हे अमेरिकेसाठीही हिताचे आहे. इराक हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनल्यास अमेरिकेवरही हल्ला होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
इराकमध्ये सैनिक तैनात करण्यास अमेरिकेचा नकार
By admin | Published: June 20, 2014 9:24 PM