नवी दिल्ली: पाकिस्तानमधील राजकीय अवकाशात हातपाय पसरू पाहणारा जमात-ऊद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याच्या राजकीय स्वप्नांना अमेरिकेने सुरूंग लावला आहे. अमेरिकेने मंगळवारी हाफिज सईदच्या मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) हा पक्ष दहशतवादी संघटना असल्याचे घोषित केले. परिणामी पक्षाच्या सुकाणू समितीच्या सात सदस्यांनाही दहशतवादी ठरवण्यात आले आहे.पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एमएमएल पक्षाला आंतरदेशीय व्यवहार खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. जेणेकरून MML ला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देता येईल. यापूर्वी आंतरदेशीय व्यवहार खात्याच्या आक्षेपामुळेच निवडणूक आयोगाने MML ला राजकीय पक्षाचा दर्जा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिकेच्या पवित्र्यामुळे MML चा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, अमेरिकेने तेहरिक-ए-आझादी-ए-काश्मीर (टीएजीके) या संघटनेचाही दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केला आहे. MML आणि टीएजीके या दोन्ही संघटना लष्कर-ए-तोयबाचा भाग आहेत. लष्कर-ए-तोयबाविरुद्धच्या कारवाईत अडथळा उत्त्पन्न करण्यासाठी या संघटनांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या कारवाईने या सगळ्याला चाप बसेल. तसेच लोकांसमोर संघटनेचा खरा चेहरा उघड होईल, असे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहीमेचे समन्वयक नॅथन सेल्स यांनी सांगितले.
हाफिज सईदच्या राजकीय स्वप्नांना सुरूंग; अमेरिकेकडून MML चा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 8:42 AM