ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 23 - जगात अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्मितीची स्पर्धा सुरु आहे. अनेक देश आपली सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी घातक शस्त्रास्त्रांची निर्मिती करत आहेत. यंदाच्या वर्षी रशिया आणि चीन या दोन देशांनी अनेक घातक शस्त्रास्त्रांची निर्मिती केली. चीनने स्वदेशी बनावटीचे फायटर जेट, अत्याधुनिक पाणबुडी, विमानवाहू युद्धनौकेचा आपल्या ताफ्यात समावेश केला. रशियानेही वेगवेगळया क्षेपणास्त्र चाचण्या केल्या. पण अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर, अमेरिका या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. अमेरिकेने असे शस्त्रास्त्र बनवले आहे की, त्याच्या पल्ल्यातून काहीही सुटू शकत नाही. अमेरिकेने मागच्या सात महिन्यात या शस्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. शक्तिशाली लेजर "लॉज" अमेरिकन नौदलाने काही दिवसांपूर्वी लॉज या लेजर शस्त्राची समुद्रात यशस्वी चाचणी केली. लॉजला विकसित करण्यासाठी तब्बल 260 कोटी रुपये खर्च झाला आहे. या क्षेपणास्त्रातून सोडल्या जाणा-या प्रत्येक लेजर किरणावर 65 रुपये म्हणजे 1 डॉलरचा खर्च येतो. प्रकाशाच्या गतीने लेजर किरण सोडणारे हे शस्त्र क्षणभरात ड्रोन विमान नष्ट करु शकते. या शस्त्राचे वैशिष्टय म्हणजे वेगवान बॅलेस्टिक क्षेपणास्त्रही हवेत नष्ट करु शकते. अमेरिकन नौदलाने यूएसएस पोंस जहाजावर याची तैनाती केली आहे. लॉजमधून निघणारी किरणे बुलेटपेक्षा अधिक अचूक वार करतात. या लेजर किरणांचे तापमान हजार डिग्री सेल्सिअस असते. लॉजमधून सुटणारी लेझर किरणे विद्युतचुंबकीय स्पेक्ट्रमच्या अदृश्य क्षेत्रात पोहोचल्यानंतर ती दिसतही नाहीत. कुठलाही आवाज होत नसल्याने शत्रूला हल्ल्याची पूर्वकल्पनाच नसते. लॉजचा वापर करण्यासाठी तीन तज्ञांची गरज पडते. लॉज हे पूर्णपणे वीजेवर अवलंबून आहे. ते चालवण्याची वीजेची गरज लागते.