ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन / इस्लामाबाद, दि. 8 - पाकिस्तानी नागरिकांवर अमेरिकेत येण्यास बंदी घालण्याचा सध्यातरी विचार नसल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे असं वृत्त पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने दिलं आहे.व्हाइट हाऊसच्या हवाल्याने डॉनने हे वृत्त दिलं आहे.
या वृत्तानुसार, व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव सीन स्पायसर म्हणाले, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि लेबनॉनसह अन्य काही देशांनी आपल्या नागरिकांविषयीची सर्व माहिती अमेरिकेला दिली आहे. तसेच नागरिकांची पूर्ण चौकशी केल्याचं या देशांनी सांगितलं आहे. या देशांकडून मिळालेल्या माहितीनंतरच या देशांवर निर्बंध न घालण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. यासोबतच देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही खोटेपणा आढळला तर या देशांचं नावंही 7 देशांच्या यादीत जोडलं जाऊ शकतं असंही स्पायसर यांनी स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेने 7 मुस्लिम बहुल देशांवर अमेरिकेत येण्यास निर्बंध घातले होते त्यानंतर न्यायालयाने हे निर्बंध उठवले आहेत. या देशांमध्ये पाकिस्तानचंही नाव जोडलं जाऊ शकतं अशी धास्ती पाकिस्तानला होती.