नवी दिल्ली : दहशतवाद्यांची आश्रयस्थळे खपवून घेतली जाणार नाहीत, अशा कणखर शब्दांत भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यास ठणकावले. या दहशतवादी संघटनांमुळे पाकिस्तानच्या स्थैर्याला आणि सरकारला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा पाकिस्तानने दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर पावले उचलावीत.भारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे विदेशमंत्री रेक्स टिलरसन यांनी एच-१-बी व्हिसा, अफगाणिस्तानमधील स्थिती, भारत-अमेरिका सुरक्षा सहकार्य आणि भारत-प्रशांत विभाग व उत्तर कोरिया या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर व्यापक चर्चा केल्यानंतर, घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून पाकिस्तानला उपरोक्त तगडा संदेश दिला.दहशवाद्यांना आश्रय, अभय देणे खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत, टिलरसन यांनी दहशतवादविरोधी लढ्यात भारताला पूर्णत: सहकार्य देण्याची ग्वाहीही दिली. सुषमा स्वराज यांनी सांगितले की, आम्ही दहशतवादावर सखोल चर्चा केली. संपूर्ण जगाला दहशतवादापासून धोका आहे. अफगाणिस्तानातील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांबाबत भारत चिंतित आहे.
दहशतवाद्यांना अभय देणे खपणार नाही, अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 4:42 AM