Donald Trump vs Kamala Harris, US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानाचे चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा जवळ येत असून निकालही येऊ लागले आहेत. आतापर्यंत एकूण ५० राज्यांपैकी ३० राज्यांचे निकाल आले आहेत. यापैकी २० मध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि १० राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस विजयी झाल्या आहेत. आता ७ स्विंग स्टेट्स काय निकाल देतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
'स्विंग स्टेट्स'कडे साऱ्यांचे लक्ष
मतदानाच्या अंदाजाचा विचार करता, आतापर्यंत मतदानात कोणताही मोठा बदल झालेला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या राज्यांनी कमला हॅरिय यांना विजय मिळवून दिला आहे. तर रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी कौल दिला आहे. त्यामुळे आता ७ स्विंग स्टेट्सचे निकाल येईपर्यंत कोणताही पक्ष विजयाचा दावा करू शकत नाही. उत्तर कॅरोलिना, नेवाडा, विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि ऍरिझोना अशी ही ७ राज्ये आहेत. स्विंग स्टेट्स ही अशी राज्ये आहेत जिथे दोन पक्षांमधील मतांचे अंतर खूपच कमी असते. त्यामुळे या राज्यांमध्ये पारडे कुणाच्याही बाजूने झुकू शकते.
कमला जिंकल्या तर इतिहास रचला जाणार
५३८ इलेक्टोरल मतांसाठी म्हणजेच अमेरिकेतील ५० राज्यांमधील जागांसाठी मंगळवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता मतदानाला सुरुवात झाली. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सर्व राज्यांमध्ये मतदान संपल्यावर पुढील चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागेल. सध्याच्या आकडेवारीनुसार तरी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसोबतच संसदीय निवडणुकीतही ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला आघाडी मिळालेली आहे. पण जर या निवडणुकीत कमला हॅरिस जिंकल्या तर २३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद मिळेल.