Donald Trump vs Kamala Harris, US Elections 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे ५ आठवडे उरले असून, राष्ट्रीय सर्वेक्षणात सातत्याने आघाडीवर असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना आता मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षीय निवडणुकीत निर्णायक मानल्या जाणाऱ्या ७ पैकी ५ स्विंग राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत सध्या खूपच रंजक असल्याचे दिसून येत आहे. 'अॅटलासइंटेल'च्या ताज्या सर्वेक्षणात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ पैकी ५ स्विंग राज्यांमध्ये आघाडी घेतली आहे. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल ठरवण्यात स्विंग राज्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
स्विंग राज्यांमध्ये ट्रम्प यांचे वर्चस्व!
काही दिवसांपूर्वी कमला हॅरिस ७ पैकी ६ राज्यांमध्ये आघाडीवर होत्या. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ राज्यांमध्ये आघाडी घेतली आहे. AtlasIntel च्या ताज्या सर्वेक्षणात, कमला फक्त उत्तर कॅरोलिना आणि नेवाडा या दोन राज्यांमध्येच ट्रम्प यांच्या पुढे आहेत. त्यांची आघाडी अनुक्रमे २ आणि ३ गुणांची आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि ऍरिझोनामध्ये आघाडी मिळाली असल्याचे दिसले आहे. जॉर्जिया आणि ॲरिझोनामध्ये ट्रम्प केवळ एका गुणाने पुढे असले तरी, पेनसिल्व्हेनियामध्ये ९० इलेक्टोरल मते असलेल्या ट्रम्प यांची आघाडी ३६ गुणांची आहे. मिशिगनमध्येही ट्रम्प कमला हॅरिस यांच्यापेक्षा ३ गुणांनी पुढे आहे. याशिवाय त्यांच्याकडे विस्कॉन्सिनमध्ये २ गुणांची आघाडी आहे.
इलॉन मस्क यांचा खोचक टोमणा
ट्रम्प यांचे मित्र आणि SpaceX चे CEO इलॉन मस्क यांनी ट्विटरवरून डेमोक्रॅटिक पक्षाचा समाचार घेतला. मस्क यांनी लिहिले की, डेमोक्रॅटिक पक्ष स्विंग राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षापेक्षा जास्त पैसा खर्च करत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या देणगीदारांच्या यादीचा संदर्भ देत त्यांनी लिहिले की, डेमोक्रॅटिक पक्ष हा श्रीमंतांचा आणि अधिकाऱ्यांचा पक्ष झाला आहे, तर रिपब्लिकन पक्ष हा लोकांचा पक्ष आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मस्कने रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाला देणगी देणाऱ्या देणगीदारांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार कमला हॅरिस यांना गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, ॲमेझॉनसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत.
ट्रम्प यांनी २०१६ मध्ये व्यक्त केली होती नाराजी
स्विंग राज्यांच्या ताज्या सर्वेक्षणात निकाल बदलला असल्याने आता कमला हॅरिस यांच्यासाठी मोठी अडचण होऊ शकते. कारण २०१६ मध्ये जेव्हा ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात स्पर्धा होती, तेव्हाही स्विंग राज्यांनी ट्रम्प यांच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना ४८ टक्के मते मिळाली होती तर डोनाल्ड ट्रम्प यांना ४५.९ टक्के मते मिळाली होती. पण ट्रम्प यांनी विजयासाठी आवश्यक २७२ इलेक्टोरल मते मिळवली होती.