वॉशिंग्टन : ‘अध्यक्षीय निवडणुकीत जाणूनबुजून निर्माण करण्यात आलेला दुभंग आता दूर लोटत सर्वांनी एकत्र येऊन काम करू या. माझ्यासाठी सर्व राज्ये सारखीच आहेत. राज्याराज्यात मी दुजाभाव करणार नाही. मी तुम्हा सर्वांचा अध्यक्ष आहे. फक्त डेमोक्रॅटस्चा नाही...’, असे सांगत अमेरिकेच्या अध्यक्षपदी नुकतेच निवडून आलेल्या जो बायडेन यांनी अमेरिकी जनतेला निवडणुकीतील कटुता विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले.
पेनसिल्व्हेनिया राज्यातून निर्णायक आघाडी मिळविल्यानंतर जो बायडेन हेच अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असतील, यावर शिक्कामोर्तब झाले. आपल्या विजयानंतर बायडेन यांनी डेलावेअर येथील त्यांच्या मूळ गावी विल्मिंग्टन येथे लोकांशी संवाद साधला. त्यावेळी बायडेन यांनी सर्वांनी कटुता विसरून अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
बायडेन म्हणाले की, ‘अमेरिकेला दुभंगण्याचे नव्हे, तर एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे मी प्रतिनिधित्व करण्याची प्रतिज्ञा करतो. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ ठरविण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. मला मते देणाऱ्यांचा मी ऋणी आहे. मात्र, ज्यांनी मला मतदान केले नाही, त्यांचाही मी अध्यक्ष आहे. मी सर्वांचे प्रतिनिधित्व करणार आहे. अमेरिकी जनतेने मतपेटीतून आपली इच्छा व्यक्त करीत मला स्पष्ट बहुमत दिले आहे. तेव्हा निवडणूककाळात निर्माण करण्यात आलेला दुभंग, कटुता विसरून एकत्र येऊन पुन्हा अमेरिकेला महान बनवू या.’