वॉशिंग्टन : अमेरिकी जनतेने अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांना पसंती दर्शवली आहे. मात्र, विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्याप हार मानायला तयार नाहीत. ‘शेवटचे मत मोजले जाईपर्यंत मी विश्रांती घेणार नाही. मला माझ्या मतदारांवर विश्वास आहे’, असे सांगत ट्रम्प यांनी माघार घेण्याची आपली तयारी नसल्याचे संकेत दिले.
जो बायडेन यांना पेनसिल्व्हेनिया राज्यातून निर्णायक आघाडी मिळाल्यानंतर २७० हा बहुमताचा आकडा पार केला. त्यानंतरच अमेरिकी प्रसारमाध्यमांनी बायडेन हेच अध्यक्ष असतील, असे जाहीर केले. ट्रम्प यांना अद्याप हार मान्य नाही. अध्यक्षपदाची निवडणूक आपण हरलो आहोत, हे वास्तव त्यांनी अद्याप स्वीकारलेले नाही. ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा, यासाठी त्यांचे जावई जेरेड कुश्नेर स्वत: त्यांच्याशी संवाद साधणार होते.
अध्यक्षीय निवडणुकीसाठी अखेरचे मतदान झाल्यानंतर नियोजित अध्यक्षाला कारभार हाती घेण्यासाठी ७८ दिवसांचा कालावधी असतो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतमोजणीला वेळ लागत असल्याने हा कालावधी कमी पडण्याची शक्यता आहे; परंतु जो बायडेन यांनी अध्यक्षपदासाठीच्या पूर्वतयारी सुरु केली आहे.