वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या समर्थकांना संबोधित करताना, राष्ट्राध्यक्ष होताच आपण कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कठोर नियम लागू अरणार आहोत, असे संकेत दिले आहेत. सध्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचे विक्रमी रुग्ण समोर येत आहेत. असे असताना या घातक महामारीतून देशाला सावरणे, हे बायडन यांच्या समोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
ट्रम्प यांनी मास्क लावण्यास अनेक वेळा दिलाय नकार -रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर अनेक वेळा कोरोनाला सहज घेतल्याचे आरोप झाले आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी अनेक वेळा मास्क न लावण्यासंदर्भातही भाष्य केले आहे. लॉकडाउनसंदर्भातही ट्रम्प यांचा दृष्टीकोन योग्य नव्हता. असा निर्णय म्हणजे देशाच्या प्रगतीत बाधा असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या या मतावर अमेरिकेच्या संसर्गजन्य आजारांचे सर्वात मोठे तज्ज्ञ डॉक्टर फौसी यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी टीकाही केले होते.
...तेव्हा ट्रम्प यांनाही मास्क लावणे आवश्यक असेल -डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष होताच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक केला, तर ट्रम्प यांनाही मास्क लावणे बंधनकारक असेल. आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असल्याने ट्रम्प हे अधिकांश सार्वजनिक सभांमध्ये मास्क न लावताच दिसून आले आहेत.
"मास्क लावणारे अधिक संक्रमित होतात" -अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान मियामी येथे एनबीसी न्यूज टाऊन हॉल कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले होते, फेस मास्क लावणारे लोक कोरोनाने अधिक संक्रमित होतात. मात्र, आपला दावा सत्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी कुठलाही पुरावा दिलेला नव्हता.
ट्रम्प यांनी एका रॅलील मास्क काढून समर्थकांच्या दिशेने भिरकावले होते -डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर प्रचारादरम्यान जॉन मुर्था जॉन्सटाऊनच्या केंब्रिया काउंटी एअरपोर्टवर एका रॅलीला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी आपले मास्क काढून समर्थकांच्या दिशेने भिरकावले होते. यापूर्वी त्यांनी पत्रकारांसमोरच आपले मास्क काढले होते.