Donald Trump vs Kamala Harris, US Election 2024 : अमेरिकेचा पुढचा अध्यक्ष कोण असेल डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरीस? यासंदर्भात आणखी काही वेळाने चित्र स्पष्ट होईल. मतदानानंतर, या दोहोंपैकी कोण जिंकणार, यासंदर्भात कयास लावले जात आहेत. मात्र, यातच आता एका मोठ्या भविष्यवाणीने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका दिला आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांना कमला हॅरिस यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज अमेरिकन लेखक तथा राजकीय भविष्यवाणीकरता ॲलन लिचमन यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाचे म्हणजे, लिचमन यांना अमेरिकेचा 'नॉस्ट्रॅडॅमस' म्हटले जाते. लिचमन यांनी अनेक देशांतील निवडणुकांसंदर्भात अंदाज वर्तवले आहेत. त्यांची भविष्यवाणी कधीही चुकीची ठरलेली नाही.
सर्व ओपिनिअन पोल आगीमध्ये फेकून द्यायला हवेत -लिचमन यांनी एनडीटीव्हीशी बोलताना कमला हॅरिस ट्रम्प यांच्याविरोधात आघाडी घेतील, अशी भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले, "सर्व ओपिनिअन पोल आगीमध्ये फेकून द्यायला हवेत. मी म्हणतो, आपल्याकडे कमला हॅरिस असतील. त्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन-आशियन वंशाच्या पहिल्या राष्ट्रपती बनत आहेत."
असे आहेत आतापर्यंतचे निकाल -फॉक्स न्यूजनुसार, सध्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. ट्रम्प यांना 21o इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली आहेत, तर डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना 113 इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली आहेत.'स्विंग स्टेट्स'कडे जगाचे लक्ष, ...तर अमेरिकेत इतिहास घडेल - मतदान अंदाजाचा विचार करता, आतापर्यंतच्या मतदानात कोणताही मोठा बदल झालेला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या राज्यांनी कमला हॅरिय यांना विजय मिळवून दिला आहे. तर रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी कौल दिला आहे. त्यामुळे आता ७ स्विंग स्टेट्सचे निकाल येईपर्यंत कोणताही पक्ष विजयाचा दावा करू शकत नाही. उत्तर कॅरोलिना, नेवाडा, विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि ऍरिझोना अशी ही ७ राज्ये आहेत. स्विंग स्टेट्स ही अशी राज्ये आहेत जिथे दोन पक्षांमधील मतांचे अंतर खूपच कमी असते. त्यामुळे या राज्यांमध्ये पारडे कुणाच्याही बाजूने झुकू शकते. महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत कमला हॅरिस जिंकल्या, तर 230 वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला देशाची राष्ट्राध्यक्ष बनेल.