वॉशिंग्टन : टोनी लॅब्रांचे हा अवघ्या १८ वर्षांचा तरुण न्यू हॅम्पशायरच्या राज्य प्रतिनिधीगृहात निवडून आला आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या कमी वयाचा उमेदवार राज्य प्रतिनिधीगृहात निवडून आला आहे.
न्यू हॅम्पशायरमधील ॲमहर्स्ट या गावातून टोनी लॅब्रांचे निवडणुकीसाठी उभा होता. त्याने डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवडणूक लढवत आपल्या रिपब्लिकन प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. अवघ्या दहा वर्षांचा असताना कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने टोनीला ग्रासले होते. त्यातून तो बरा झाला. त्यानंतर टोनीने स्थानिक राजकारणात डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधित्व केले.
तो सध्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या ॲमहर्स्ट गावातील शाखेचा खजिनदार आहे. समलैंगिक असलेल्या टोनीने रिपब्लिकन पक्षाविरोधात लढण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे तिकीट मिळवले. त्याने व त्याच्या मित्रांनी प्रचाराची मोहीम आखली. ॲमहर्स्ट गावातून टोनी साडेतीन हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झाला.