ठळक मुद्देमी असा राष्ट्राध्यक्ष बनेन जो देश आणि समाजाला तोडण्याचा नाही तर जोडण्याचा प्रयत्न करेल मी असा राष्ट्राध्यक्ष असेन जो अमेरिकेतील राज्यांना लाल आणि निळ्या रंगात पाहणार नाही तर संयुक्त राज्य अमेरिकेच्या रूपात पाहील आता आपापसातील मतभेद विसरून जाण्याची वेळ आली आहे. निवडणुकीमुळे वातावरण तापले होते. ते कमी करण्याची वेळ आली आहे
वॉशिंग्टन - आक्रमक प्रचार, अटीतटीची झालेली निवडणूक आणि मतमोजणीदरम्यान निर्माण झालेल्या वादानंतर अखेर अमेरिकेच्या भावी अध्यक्षपदाची माळ डेमोक्रॅटिक पार्टीच्या जो बायडेन यांच्या गळ्यात पडली. शनिवारी रात्री बायडेन यांना अधिकृतरीत्या विजयी घोषित करण्यात आले. जो बायडेन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बायडेन यांनी देशवासियांना संबोधित करताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मी समाजाला तोडणार नाही, तर जोडणार आहे, असे आश्वासन बायडेन यांनी दिले आहे.बायडेन म्हणाले की, मी तुम्हाला आश्वासन देतो की, ''मी असा राष्ट्राध्यक्ष बनेन जो देश आणि समाजाला तोडण्याचा नाही तर जोडण्याचा प्रयत्न करेल. मी असा राष्ट्राध्यक्ष असेन जो अमेरिकेतील राज्यांना लाल आणि निळ्या रंगात पाहणार नाही तर संयुक्त राज्य अमेरिकेच्या रूपात पाहील आणि पूर्ण क्षमता आणि कसोशीने जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल.''
अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना बायडेन म्हणाले की, आता आपापसातील मतभेद विसरून जाण्याची वेळ आली आहे. निवडणुकीमुळे वातावरण तापले होते. ते कमी करण्याची वेळ आली आहे. आता आपण पुन्हा एकदा एकमेकांना भेटले पाहिजे. तसेच एकमेकांचे ऐकले पाहिजे. ही वेळ अमेरिकेच्या जखमेवर मलम लावून फुंकर मारण्याची आहे.अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोण, याचे उत्तर अखेरीस शनिवारी स्पष्ट झाले. पेनसिल्व्हेनिया राज्यातील निर्णायक मते मिळवत जो बायडेन यांनी अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला २७० हा बहुमताचा आकडा गाठला. त्यांच्या खात्यात आता २८४ प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल व्होट्स) आहेत. तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. अजूनही काही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू असली तरी बायडेन हेच अमेरिकेच्या अध्यक्षपदी असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या २० जानेवारी रोजी बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण करतील.कोरोनाकहराने टोक गाठलेले असताना झालेली अध्यक्षीय निवडणूक चुरशीची झाली. सुरुवातीला आघाडी घेणारे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नंतर अनेक राज्यांमधून पिछाडीवर पडू लागले. त्यामुळे सर्वांचे लक्ष जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, नेवाडा, अरिझोना आणि नॉर्थ कॅरोलायना या राज्यांमधील मतमोजणीकडे लागले होते. यापैकी नॉर्थ कॅरोलायना राज्यातच ट्रम्प यांना आघाडी मिळाली होती.उर्वरित सर्व राज्यांत बायडेन आघाडीवर होते. शनिवारी २० प्रातिनिधिक मते असलेल्या पेनसिल्व्हेनिया राज्यांत बायडेन यांनी विजय मिळवत आपली प्रातिनिधिक मतांची संख्या २८४ पर्यंत वाढवली आणि तिथेच ट्रम्प यांचा पराभव निश्चित झाला. दरम्यान, पराभव निश्चित होत असताना, मी ही निवडणूक जिंकलो असल्याचे ट्विट ट्रम्प यांनी करीत रडीचा डाव सुरूच ठेवला.