संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या निकालांमधून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष होतील, हे स्पष्ट झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच जोरदार मुसंडी मारत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली. यादरम्यान, भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार राजा कृष्णमूर्ती हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याचे वृत्त आहे.
राजा कृष्णमूर्ती यांनी रिपब्लिकन उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला. राजा कृष्णमूर्ती यांनी इलिनॉयच्या ८ व्या कॉंग्रेशनल डिस्ट्रिक्टमधून सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये ते या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतील. त्यांनी ५७.१ टक्के मते मिळवून निवडणूक जिंकली. तर रिपब्लिकन पक्षाचे मार्क राईस यांना ४२.९ टक्के मते मिळाली. राजा कृष्णमूर्ती यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती.
दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मतं मिळवणं आवश्यक असतं. दरम्यान आतापर्यंत ४८१ निकाल हाती आले असून, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना २६७ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. तर कमला हॅरिस यांना २१४ इलेक्टोरल मतं मिळाली आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे विस्कॉसिन, मिशिगन, अॅरिझोना, नेवाडा आणि अलास्का या राज्यांमध्ये आघाडीवर असल्याने ते तीनशेपार मजल मारतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत राजा कृष्णमूर्ती?राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म भारतात झाला, पण ते अमेरिकेतील बफेलो येथे लहणाचे मोठे झाले. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी इलिनॉयचे डेप्युटी स्टेट कोषाध्यक्ष पद भूषवले होते. इलिनॉयचे विशेष सहाय्यक अॅटर्नी जनरल आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे धोरण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. कृष्णमूर्ती हे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेसह धोरणांचे समर्थन करतात. सध्या ते इंटेलिजन्स अँड ओव्हरसाइट कमिटीचे वरिष्ठ सदस्य आहेत.