Vladimir Putin Donald Trump, US Election 2024: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. अमेरिका आणि रशिया यांच्यातील राजकीय संबंध प्रचंड तणावपूर्ण असताना हे अभिनंदन करण्यात आले. विशेषत: रशियाविरूद्धच्या युद्धात अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. परंतु असे असूनही पुतिन यांनी एका कार्यक्रमात ट्रम्प यांचे अभिनंदन करत, ट्रम्प हे एक धाडसी नेते असल्याचे कौतुकोद्गार काढले.
पुतीन यांनी ट्रम्प यांच्या धाडसाचे कौतुक केले. एवढेच नाही तर जुलैमध्ये त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतरही त्यांनी जी लढाऊवृत्ती दाखवली त्याचेही कौतुक केले. 'मी ट्रम्प यांचा स्वभाव पाहिला आहे. त्यांनी खूप धाडस दाखवले. आपल्यावर जीवघेणा हल्ला होतो तेव्हा आपल्याला भीती वाटते. पण ट्रम्प यांनी धाडसाने आपली निवडणूक प्रचाराची मोहिम पुढे सुरुच ठेवली आणि विजय मिळवला,' अशा शब्दांत पुतिन यांनी ट्रम्प यांची स्तुती केली.
पुतिन यांनी असेही सांगितले की ते ट्रम्प यांच्याशी ते चर्चेसाठी तयार आहेत आणि अमेरिकेशी संबंध पूर्ववत करण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नाही, परंतु ते पूर्णपणे अमेरिकेच्या सरकारवर अवलंबून आहे. आम्ही रशियाच्या दिशेने पावले उचण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे रशिया-अमेरिका संबंध पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर, ट्रम्प यांनी मोठ्या स्विंग राज्यांमध्ये चमकदार कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले. ट्रम्प यांच्या या विजयानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले, त्यात पुतिन यांचे नाव सर्वात मोठे मानले जात आहे. बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही ट्रम्प यांचे अभिनंदन केले आणि व्हाईट हाऊसमध्ये सत्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत बोलले. याचदरम्यान, ट्रम्प यांचा विजय हा अमेरिका आणि रशियामधील संबंध सुधारण्याची संधी ठरू शकतो, असा विश्वास पुतिन यांनी व्यक्त केला आहे.