वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पार्टीचे जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सलग दुसऱ्यांदा लोकांनी पॉप्युलर वोटमध्ये पराभूत केले आहे. याआधी बेंजामिन हॅरिसन यांचाही लोकांनी पॉप्युलर वोट्समध्येही पराभव केला होता.
1888 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान बेंजामिन यांना कमी मतं होती. मात्र असं असूनही ते राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यांनी नंतरही निवडणूक लढवली. मात्र, ग्रोव्हर क्लेवलँड यांनी त्यांचा पराभव केला. 2020 मध्येजो बायडन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला. मागील आठ राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपैकी सात वेळेस (1992, 1996, 2000, 2008, 2012 आणि 2016) डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवारांनी पॉप्युलर वोट्समध्ये बाजी मारली आहे. 2016 मध्ये ट्रम्प यांच्यापेक्षा हिलरी क्लिंटन यांना अधिक मते होती. मात्र, तरीदेखील क्लिंटन यांना पराभव स्विकारावा लागला होता.
जो बायडन यांनी पॉप्युलर वोट्समध्ये रचला इतिहास
अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी पॉप्युलर वोट्समध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बायडन यांना 75 मिलियन हून अधिक मते मिळाली आहेत. अमेरिकेत झालेल्या मतदानापैकी 50 टक्क्यांहून अधिक मते बायडन यांना मिळाली. बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा रेकॉर्ड मोडला आहे. ओबामा यांना 2008 मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 69,498,516 मते मिळाली होती.
अमेरिकेतील निवडणूक प्रक्रिया ही थोडी वेगळी आहे. 1824 मध्ये जॉन क्वांसी अॅडम्स, 1876 मध्ये रुदरफर्ड हॅरिसन, 2000 मध्ये जॉर्ज बुश आणि 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पॉप्युलर मते कमी मिळाली होती. मात्र, तरीदेखील ते राष्ट्राध्यक्ष झाले होते. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बायडेन यांनी देशवासियांना संबोधित करताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मी समाजाला तोडणार नाही, तर जोडणार आहे, असे आश्वासन बायडेन यांनी दिले आहे.
‘’देश आणि समाजाला तोडणार नाही तर जोडणार’’, विजयानंतर बायडेन यांचे मोठे विधान
बायडेन म्हणाले की, मी तुम्हाला आश्वासन देतो की, ''मी असा राष्ट्राध्यक्ष बनेन जो देश आणि समाजाला तोडण्याचा नाही तर जोडण्याचा प्रयत्न करेल. मी असा राष्ट्राध्यक्ष असेन जो अमेरिकेतील राज्यांना लाल आणि निळ्या रंगात पाहणार नाही तर संयुक्त राज्य अमेरिकेच्या रूपात पाहील आणि पूर्ण क्षमता आणि कसोशीने जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल.'' अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना बायडेन म्हणाले की, आता आपापसातील मतभेद विसरून जाण्याची वेळ आली आहे. निवडणुकीमुळे वातावरण तापले होते. ते कमी करण्याची वेळ आली आहे. आता आपण पुन्हा एकदा एकमेकांना भेटले पाहिजे. तसेच एकमेकांचे ऐकले पाहिजे. ही वेळ अमेरिकेच्या जखमेवर मलम लावून फुंकर मारण्याची आहे.