US Embassy in Pakistan Issues Security Alert: पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांसाठी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा एजन्सींच्या सतर्कतेनंतर, संभाव्य हल्ल्याच्या कारणास्तव अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांना इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या सुरक्षा अलर्टमध्ये म्हटले आहे की, आता ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त सुट्टीचे दिवस आहेत. पण इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमधील अमेरिकन लोकांवर हल्ल्या करण्याची योजना आखली जात आहे. अमेरिकन दूतावासातील कर्मचार्यांना अलर्ट जारी करताना, अमेरिकन सरकारने सांगितले की, सुट्ट्यांच्या काळात इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये अज्ञात व्यक्ती अमेरिकी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे इस्लामाबादमधील दूतावास तत्काळ प्रभावाने सर्व अमेरिकन कर्मचाऱ्यांना इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये जाण्यापासून रोखत आहे.
सार्वजनिक कार्यक्रमात जाण्यासही बंदी
अमेरिकन दूतावासातील कर्मचार्यांना सार्वजनिक कार्यक्रम आणि मेळाव्यात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेने दूतावासातील कर्मचार्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव 'रेड अलर्ट' जारी केला आहे. दूतावासाने कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या काळात इस्लामाबादला अनावश्यक आणि अनौपचारिक भेटी टाळण्याचेही आवाहन केले आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला
अमेरिकन दूतावासाने आपल्या कर्मचार्यांना कार्यक्रम, प्रार्थनास्थळांवर सतर्क राहण्यास आणि मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास सांगितले. तुमच्या वैयक्तिक सुरक्षा योजनांची खात्री करा, फिरताना प्रत्येक ठिकाणी आयडी घेऊन जा आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या नियमांचे पालन करा. आपल्या सभोवतालच्या परिसराचे भान ठेवा. तसेच स्थानिक मीडियाच्या बातम्यांवरही लक्ष ठेवा. यासोबतच अमेरिकन दूतावासाने मदतीसाठी मोबाईल क्रमांकही जारी केले आहेत. इस्लामाबाद, लाहोर, कराची, पेशावर या सर्व ठिकाणांसाठी क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
या जिल्ह्यांमध्ये हल्ल्याचा इशारा
जारी केलेल्या अलर्टनुसार, खैबर-पख्तुनख्वा प्रांतात, बौजर, मोहमंद, खैबर, ओरकझाई, कुर्रम, उत्तर वझिरीस्तान आणि दक्षिण वझिरीस्तान याशिवाय चारसड्डा, कोहाट, टँक, बन्नू, लक्की, डेरा इस्माईल खान, स्वात, बुनेर आणि लोअर दीर. जाणे धोकादायक ठरू शकते. यासोबतच पेशावर जिल्हा, चित्राल, बलुचिस्तान, चिलास आणि नियंत्रण रेषेपासून १० मैल दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.