काबूल : तालिबान्यांनीअफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देश सोडण्यासाठी अमेरिकेला ३१ ऑगस्टची मुदत दिली होती. परंतु एक दिवस आधीच अमेरिकेने येथून परतीची मोहीम पूर्ण केली आहे. अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने सोमवारी दुपारी काबूलहून उड्डाण केले.
अमेरिकेची परतीची मोहीम पूर्ण झाल्यानंतर काबूल विमानतळाचा ताबा तालिबान्यांनी घेतला. रात्रभर तालिबान्यांनी विजयोत्सवच साजरा केला. मिठाईचे वाटप केले. काबूल विमानतळावर हवेत जोरदार फायरिंग केली.अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, इथे आमचे सैन्य गेली २० वर्षे होते. ही उपस्थिती आता संपली. गेल्या १७ दिवसात आमच्या सैन्याने आजवरच्या अमेरिकी इतिहासातील सर्वात मोठे एअरलिफ्ट पार पाडले.
हेलिकॉप्टरमधून फासावर लटकवले
दरम्यान अमेरिकेला मदत केल्याच्या रागातून तालिबान्यांची एका व्यक्तीला चालत्या हेलिकॉप्टरमधून फासावर लटकवले. कंदहार परिसरात घिरट्या घालत असलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
भारताची तालिबान्यांशी पहिल्यांदा चर्चा
भारत व तालिबान्यांमध्ये मंगळवारी पहिल्यांदा औपचारिक चर्चा झाली. भारताचे कतारमधील राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानी नेता शेर मोहमंद अब्बास स्टेनेकझई यांच्याशी दोहामधील भारतीय राजदूतावासात बातचित केली. तिथे अडकून पडलेल्या भारतीयांना सुरक्षित परतण्यास मदत करणे, हा चर्चेतील मुख्य मुद्दा होता. भारताशी चर्चा करणारे अब्बास यांनी त्यांचे लष्करी शिक्षण डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून घेतले आहे.