CEO Daksh Gupta Death Threats: काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी दिवसातून 10-12 तास काम करण्याचे वक्तव्य केल्याने मोठा वाद झाला होता. आता अशाच प्रकारचे विधान केल्यामुळे अमेरिकेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअपच्या भारतीय CEO ला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथील ग्रेप्टाइल कंपनीचे प्रमुख दक्ष गुप्ता यांना या धमक्या मिळाल्या आहेत.
अमेरिकन एआय स्टार्टअप ग्रेप्टाइलचे सीईओ दक्ष गुप्ता यांनी दावा होता की, सोशल मीडियाद्वारे त्यांच्या कंपनीची कार्यपद्धती सांगितल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळाल्या आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये कंपनीत आठवड्यातून 84 तास काम आणि वर्क-लाइफ बॅलन्स नसल्यावर भाष्य केले होते. यामुळे ते चर्चेत आले, पण आता यामुळेच धमक्या मिळत आहेत.
पोस्ट व्हायरल सीईओ दक्ष गुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'ग्रेप्टाइलमध्ये आठवडा 84 तासांचा असतो आणि इथे घड्याळ रात्री उशिरापर्यंत चालते. वीकेंडलाही कर्मचारी इथे काम करतात. अलीकडेच मी कंपनीत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या नवीन उमेदवारांना सांगू लागलो की, ग्रेप्टाइलमध्ये वर्क-लाइफ बॅलन्स नाही. साधारणत: दररोज कर्मचाऱ्यांचे काम सकाळी 9 वाजता सुरू होते आणि रात्री 11 वाजता संपते. आम्ही शनिवारी आणि कधीकधी रविवारी देखील काम करतो.' त्यांचे ट्विट झपाट्याने व्हायरल झाले आणि आतापर्यंत त्याला 1.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
यानंतर, त्यांनी नुकतीच आणखी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, कंपनीच्या वर्क लाईफबद्दल सांगितल्यामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. 20 टक्के इनबॉक्स जीवे मारण्याच्या धमक्यांनी भरल्याचे दक्ष आपल्या पोस्टमध्ये सांगतात. त्यांच्या या पोस्टमुळे दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. काहीजण त्यांच्यावर टीका करत आहेत, तर काहीजण त्यांचे समर्थन करत आहेत.