जाको राखे साइयां, मार सके न कोय ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. या म्हणीला साजेशी अशी एक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील केंटुकीमध्ये एक ४ वर्षाचा मुलगा ७० फूट उंच डोंगराहून खाली पडला. मुलगा खाली पडला म्हटल्यावर आई-वडिलांचा श्वास रोखला गेला होता. ते धावत मुलापर्यंत पोहोचले तर त्याला केवळ जरासं खरचटलं होतं. त्याला कोणताही मोठी इजा झाली नाही. लोक या घटनेला चमत्कार म्हणत आहेत.
केंटुकीच्या शोध आणि बचाव दलाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, शुक्रवारी हा मुलगा आपल्या पालकांसोबत डेनिअल बून नॅशनल फॉरेस्टमध्ये फिरायला गेला होता. दुपारी हा मुलगा डोंगराहून खाली घसरला आणि घरंगळत तो खाली गेला. यादरम्यान तो अनेक टोकदार दगडांना भिडला आणि ७० फूट खाली जाऊ पडला. यानंतर मुलाच्या वडिलांनी लगेच हालचाल केली आणि ते मुलाकडे धावत गेले.
वडिलांना आपला मुलगा दिसताच त्यांनी त्याला लगेच जवळ घेतलं आणि हायवेकडे गेले. जिथे त्यांना शोध आणि बचाव दलाची टीम भेटली. ते म्हणाले की, 'हे अविश्वसनिय आहे. मुलाला जरासं खरचटलं होतं आणि बाकी तो ठीक होता. हा मुलगा बरंच बोलत होता आणि सुपरहिरोबाबत उत्साहित होता'. टीम म्हणाली की, त्यावेळी केवळ एकच सुपरहिरो होता. तो म्हणजे हा मुलगा.
डॉक्टरांच्या टीमने मुलाला चेक केलं आणि नंतर आई-वडिलांकडे सोपवलं. बचाव दलाने याला एक चमत्कारच म्हटलंय. बचाव दलाने सांगितलं की, इतक्या उंचीवरून पडून व्यक्तीचं काय होईल सांगता येत नाही आणि अनेकदा तर लोकांचे जीवही जातात. इथून अनेकांना जखमी अवस्थेत काढलं आहे. एक व्यक्ती अपंग झाली.