वॉशिंग्टनः अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास दोन दशकांनंतर पुन्हा एकदा अमेरिकेत मृत्युदंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या पाच जणांच्या मृत्युदंडाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. अमेरिकेचे अॅटर्नी जनरल विल्यम बर्र म्हणाले, न्याय मंत्रालयानं या पाच हत्यारांसह सर्वात कुख्यात आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी केली आहे.प्रत्येक आरोपीच्या प्रकरणात निष्पक्ष सुनावणी झाल्यानंतर त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. न्याय मंत्रालयानं आधीची दिलेली शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली आहे आणि आम्ही पीडित अन् त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी या दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करतो आहे. बर्र यांनी न्याय मंत्रालयाला संघीय मृत्युदंड प्रोटोकॉलचा प्रस्तावातील तरतुदी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. जे संघीय सरकारद्वारे जवळपास दोन दशकांपूर्वी बनवण्यात आले होते.या प्रस्तावातील तरतुदींमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेचाही उल्लेख होता. त्यामुळे आता अमेरिकेत यापुढे सर्वात खतरनाक आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. ज्या पाच आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे, त्यामध्ये डेनियल लेविस ली, लेजमंड मिचेल, वेस्ली इरा पुर्के, अल्फ्रेड बुर्जुआ आणि डस्टिन ली हॉन्केन यांचा समावेश आहे. या आरोपींना क्रमशः नऊ डिसेंबर 2019, 11 डिसेंबर 2019, 13 डिसेंबर 2019, 13 जानेवारी 2020 आणि 15 जानेवारी 2020ला शिक्षा दिली जाणार आहे.
20 वर्षांनंतर पुन्हा एकदा अमेरिकेत ट्रम्प प्रशासन देणार मृत्युदंड, 5 आरोपींची मृत्यूची तारीख ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 11:13 AM