ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 20 - पाकिस्तानने 1998 साली केलेल्या अणूचाचणीबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. 1998 साली पाकिस्तानने अणूचाचणी करु नये यासाठी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला पाच अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती असा दावा नवाझ शरीफ यांनी केला आहे. मला पाकिस्तानची काळजी नसती, मी देशाप्रती प्रामणिक नसतो तर, मी अमेरिकेची पाच कोटी रुपयांची ऑफर स्वीकारुन अणू चाचणी केली नसती असे नवाझ शरीफ म्हणाले.
भारताने तत्कालिन पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पोखरणमध्ये 1998 साली यशस्वी अणूचाचणी केल्यानंतर पाकिस्तानात मोठया प्रमाणावर अस्वस्थतता निर्माण झाली होती. त्यानंतर पाकिस्ताननेही लगेच काही दिवसांनी अणूचाचणी केली होती.
पंजाबच्या सियालकोटमध्ये बुधवारी एका जनसभेला संबोधित करताना शरीफ यांनी हा दावा केला. सध्या नवाझ शरीफ भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये फसले आहेत. पनामा पेपर लीक प्रकरणात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांची परदेशात अनेक कंपन्या, बेनामी मालमत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे.
आणखी वाचा
पनामा पेपर लीक प्रकरणात नवाझ शरीफ यांच्यावर जे बेनामी संपत्ती जमा केल्याचे आरोप होत आहेत. त्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने संयुक्त तपास पथक स्थापन केले आहे. या तपास पथकाच्या अहवालावर नवाझ शरीफ यांचे भवितव्य टिकून आहे. जर आज मला जबाबदार धरत असाल तर, उद्या तुमची वेळ येईल असा इशारा शरीफ आपल्या विरोधकांना देत आहेत. क्रिकेटकडून राजकरणाकडे वळलेले तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इमरान खान यांनी तर, नवाझ शरीफ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आघाडी उघडली आहे.
पनामा पेपर लीक प्रकरणात नवाझ शरीफ आणखी अडचणीत
पनामा पेपर लीक प्रकरणात पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासमोरच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करणा-या संयुक्त तपास पथकाने मागच्या आठवडयात नवाझ शरीफ यांना 15 जूनला हजर रहाण्याचे आदेश दिले होते. आता या प्रकरणात संयुक्त तपास टीमने नवाझ यांचा भाऊ शहाबाजला हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
पनामा पेपर लीक प्रकरणातून अनेक जागतिक नेत्यांच्या परदेशात कंपन्या, बँक खाती असल्याचे समोर आले असून, यात नवाझ शरीफ यांच्या नावाचाही समावेश आहे. शहाबाज पंजाब राज्याचे मुख्यमंत्री असून, त्यांना 17 जूनला हजर होण्याचे आदेश दिले आहेत. शहाबाज यांना या प्रकरणी मंगळवारी समन्स मिळाले. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाच्या परदेशातील मालमत्तेची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने सहाजणांची संयुक्त तपास समिती स्थापन केली.