Pakistan Missile Project: अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं गुरुवारी पाकिस्तानविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोजेक्टमध्ये मिळणाऱ्या चीनच्या मदतीवर अमेरिकेनं बंदी घातली आहे. पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेली सक्त कारवाई कायम असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितलं. दरम्यान, ज्या चिनी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यांचा पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोजेक्टच्या पुरवठ्यात सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमेरिकेच्या या निर्णयावर पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोजेक्ट आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारात सामील असलेल्या पाच चिनी कंपन्या आणि एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेश १३३८२ नुसार, विशेषत: बीजिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑटोमेशन फॉर मशीन बिल्डिंग इंडस्ट्री (RIAMB) चा समावेश आहे. ही कंपनी मोठ्या प्रमाणात संहारक शस्त्रे आणि त्यांच्या वितरणाच्या साधनांवर काम करते.
आरआयएएमबीनं पाकिस्तानला शाहीन-३ आणि अबाबिल प्रणालीशी संबंधित उपकरणांची मदत केली आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितलं. तसंच अमेरिकेचं म्हणणं आहे की, या कंपनीनं पाकिस्तानी मिसाईल प्रोजेक्टसाठी रॉकेट मोटर्सच्या चाचणीसाठी उपकरणं खरेदी करण्यासाठी पाकिस्तानसोबत काम केलं आहे. यासोबतच, चीनच्या हुबेई हुआचांगडा इंटेलिजेंट इक्विपमेंट कंपनी, युनिव्हर्सल एंटरप्राइज आणि शिआन लाँगडे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कंपनीसह पाकिस्तानस्थित नाविन्यपूर्ण उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमध्ये एका चिनी नागरिकाचाही समावेश करण्यात आला आहे. या व्यक्तीवर चीनला उपकरणं पोहोचवण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
अमेरिकेच्या कारवाईवर चीनची काय प्रतिक्रिया?पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाईल प्रोजेक्टविरुद्धची कारवाई सुरूच राहील, मग ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून चालवले जात असले तरीही कारवाई केली जाईल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. दुसरीकडे, अमेरिकेने लादलेल्या या निर्बंधांना चीनने विरोध केला आहे. चीन अशा एकतर्फी निर्बंधांना ठामपणे विरोध करतो, अशा निर्बंधांना आंतरराष्ट्रीय कायद्याचा किंवा अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेच्या अधिकाराचा आधार नाही. बीजिंग नेहमीच चिनी कंपन्या आणि लोकांच्या हिताचे रक्षण करेल, असं अमेरिकेतील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू म्हणाले.