नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. ट्रम्प आणि इम्रान खान यांच्या काश्मीर मुद्द्यावरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी अशी चर्चा झाली.
दरम्यान नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत, काश्मीर प्रश्नावर मोदींनी माझ्याकडे मदत मागितली होती. मलादेखील भारत आणि पाकिस्तानमधील या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास आवडेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पहिल्यांदाच व्हाईट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे. इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगले बनविण्यासाठी अमेरिका महत्वाची भूमिका निभावू शकते. यावेळी ट्रम्प यांनी भारत आणि पाकला जर वाटत असेल मी मध्यस्थी करावी तर मी मध्यस्थी करण्यास तयार आहे असं सांगितले. यापूर्वीही तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अनेकदा अमेरिकेचे दौरा केला होता. त्यानंतर इम्रान खान यांनी ट्रम्प यांची भेट घेतली आहे. इम्रान खान 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.