सिंगापूर : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. तेल उत्पादक व निर्यातदार देशांकडून (ओपेक) तेल पुरवठ्यातील कपात सुरूच राहणार असल्याची शक्यता आहे. त्याचाही तेलाच्या दरांवर परिणाम झाला.
अमेरिका आणि चीन यांच्यात आधीपासूनच व्यापारयुद्ध सुरू आहे. त्यातच अमेरिका-इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. यातून जागतिक मंदीचा धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी ब्रेंट क्रूडच्या किमती २१ सेंटांनी अथवा 0.३ टक्क्यांनी वाढून ७२.१८ डॉलर प्रतिबॅरल झाल्या. अमेरिकेच्यावेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (डब्ल्यूटीआय) कच्च्या तेलाच्या किमती ३१ सेंटांनी अथवा 0.५ टक्क्यांनी वाढून ६३.४१ डॉलर प्रतिबॅरल झाल्या.लंडन कॅपिटल ग्रुपचे मुख्य संशोधक जसपीर लॉलेर यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि ओपेक देशांकडून कायम राहणार असलेली तेल उत्पादनातील कपात यामुळे तेलाच्या किमती वर चढल्या आहेत.
अमेरिकेचा इशाराट्रम्प यांनी सोमवारी इराणला जाहीर धमकी दिली. पश्चिम आशियातील अमेरिकी हितसंबंधांवर हल्ला केल्यास इराणवर सर्वशक्तीनिशी बळाचा वापर केला जाईल, असे ट्रम्प म्हणाले. इराकची राजधानी बगदादवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर त्यांनी हा इशारा दिला. या क्षेपणास्त्र हल्ल्यामागे इराणशी संबंधित लष्करी गट असावेत, असा वॉशिंग्टनला संशय आहे.