नवी दिल्ली : ओमानच्या खाडीमध्ये तेलाच्या टँकरवर दोनवेळा हल्ला झाल्याने अमेरिका आणि इराणमध्ये ताणावाचे वातावरण आहे. यातच दोन दिवसांपूर्वी इराणने अमेरिकेचे ड्रोन विमान पाडल्याने ट्रम्प यांनी हल्ल्याचे आदेश दिले होते. मात्र, काही क्षणांपूर्वी मागे घेतले होते. या सर्व तणावाचा आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर परिणाम दिसू लागला असून तेलाच्या किंमती 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे भारताने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
ओमानच्या आखातात अमेरिकेने सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तेथे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून केव्हाही दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे. यामुळे भारताने सावध पाऊल म्हणून देशाच्या तेल टँकरांवर नौदलाचे अधिकारी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्शियन आखातातून जाणाऱ्या भारतीय टँकरवर नौदल अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत.
या टँकरवर एक अधिकारी आणि दोन सशस्त्र नौसैनिक असण्याची शक्यता आहे. नौसेनेची ही टीम हेलिकॉप्टरद्वारे टँकरांपर्यत पोहोचविली जाणार आहे किंवा बोटीद्वारेही टीमला टँकरपर्यंत नेले जाऊ शकते. या टीमवर टँकरना हर्मुज खाडीतून सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारी असणार आहे.
दर दिवशी भारताचे 5 ते 8 टँकर या खाडीतून ये-जा करतात. यामध्ये कच्च्या तेलाचा मोठा साठा असतो. भारताचे 63 टक्के कच्चे तेल खाडीच्या मार्गाने आणले जाते. अराक, सौदी अरब, इरान, युएई आणि कुवेत या देशांकडून हे तेल आणले जाते.
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे मानवरहित टेहळणी विमान ईराणने पाडले होते. यानंतर संतप्त झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी ईराणवर हल्ल्याचे आदेश दिले होते. मात्र, काही मिनिटे आधी त्यांनी हा आदेश मागे घेतला. याचवेळी प्रसारमाध्यमांमध्ये ईराणच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ट्रम्पनी ठेवल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, ट्रम्प यांनी ट्वीट करत त्यांनी हल्ल्याचा आदेश मागे घेण्यामागचे कारण सांगितले आहे.
ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, ईराणच्या या कृत्याने हल्ला करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकेच्या लढाऊ विमानांवर शस्त्रास्त्रेही बसविण्यात आली होती. मात्र, मोठ्या संख्येने निष्पाप नागरिकांचा मृत्यू होणार असल्याने शेवटच्या मिनिटाला आदेश मागे घेण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला करण्यात येणार होता. मात्र, जेव्हा वरिष्ठ आधिकाऱ्यांना विचारले की, किती लोकांचा मृत्यू होईल तेव्हा त्यांनी सर, 150 असे उत्तर दिले. यामुळे हल्ला थांबविला, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.