वॉशिंग्टनः भारतानं कलम 370 हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तान भारताविरोधात आक्रमक झाला असून, पाकिस्तानने बुधवारी (7 ऑगस्ट) भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. त्यानंतर आता अमेरिकेनंही त्यांना इशारा दिला आहे. पाकिस्ताननं भारताविरोधात आक्रमक होण्याऐवजी दहशतवादावर कारवाई करावी, असे खडे बोल पाकिस्तानला सुनावले आहेत.अमेरिकेतल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या दोन प्रभावशाली खासदारांनी पाकिस्तानला भारताविरोधात कोणतीही कारवाई करण्याचा विचार करू नका, असा इशारा दिला आहे. तत्पूर्वी पाकिस्ताननं भारतासोबतचा राजकीय संबंधांचा दर्जा कमी केला आहे. यानंतर आता पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या सिव्हिल अॅव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पाकिस्तानमध्ये परदेशी विमानांच्या उड्डाणांची उंचीही वाढविण्यात आली आहे. यासोबतच आपल्या विमानांच्या मार्गातही बदल केला आहे. लाहोर भागात परदेशी विमानांना 46 हजार फुटांपेक्षा कमी उंचीवरून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधून उडणाऱ्या विमानांना पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली होती. त्यानंतर 16 जुलै भारतीय विमानांसाठी ती खुली करण्यात आली होती. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Jammu and Kashmir : भारताविरोधात कारवाईचा विचारही करू नका, अमेरिकेची पाकला तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 10:33 AM