काबूल/वॉशिंग्टन/नवी दिल्ली: अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतलं आहे. अफगाणिस्तानात शांतता नांदावी यासाठी अमेरिकन सैन्य दोन दशकं तिथे तळ ठोकून होतं. २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या भूमीवर उतरलेलं अमेरिकन सैन्य आता मायदेशी परतलं. मात्र या दोन दशकांत अफगाणिस्तानातील परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. तालिबाननं देशावर कब्जा केला आहे. त्यामुळे अमेरिकेनं २० वर्षांत नेमकं काय साधलं, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती भयावह आहे. या परिस्थितीत अफगाणी जनतेला सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या अमेरिकेवर सडकून टीका होत आहे. त्यातच आता अमेरिका आणखी एका गोष्टीवरून अमेरिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
३१ ऑगस्टपर्यंत मायदेशी निघून जा, अन्यथा परिणाम भोगा, असा इशारा तालिबाननं अमेरिकेला दिला होता. त्यानंतर अमेरिकेन सैनिकांनी माघारी परतण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे अमेरिकेनं त्यांच्यासोबत असलेलं श्वानपथक स्वत:सोबत नेलं. अफगाणिस्तानातल्या मोहिमांमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या श्वानांना सैनिक मायदेशी घेऊन गेले नाहीत. अमेरिकन सैन्याच्या मोहिमांमध्ये साथ देणाऱ्या या श्वानांचा फोटो आता व्हायरल झाला आहे. त्यात हे श्वान पिंजऱ्यांमध्ये दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला भारतानं आपल्या दूतावासातल्या श्वानांना मायदेशी आणलं आहे. काबूलमधील दूतावासात तीन श्वान होते. त्या तिघांना भारतीय कर्मचाऱ्यांनी सुखरुप मायदेशी आणलं.
सेवेत असलेल्या ४६ श्वानांसह १३० प्राणी वाऱ्यावरडेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानात तळ ठोकून असलेल्या अमेरिकन सैन्याकडे ४६ श्वानांसह एकूण १३० प्राणी होते. या सगळ्यांना अमेरिकन सैन्यानं तिथेच ठेवलं आणि स्वत: मायदेशी निघून आले. पण पेंटागॉननं या वृत्ताचा इन्कार केला आहे. अमेरिकन सैन्यानं त्यांच्या सेवेत असलेल्या कोणत्याही श्वानाला काबूलमध्ये सोडलेलं नाही, असं पेंटागॉनचे प्रेस सचिव जॉन किर्बी यांनी सांगितलं. व्हायरल झालेले फोटो अमेरिकन मॅक्सवेल-जोन्स यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या काबूल स्मॉल ऍनिमल रेस्क्यू चॅरिटीचे आहेत. हे श्वान अमेरिकन सैन्याच्या देखरेखीखाली नव्हते, असं किर्बी म्हणाले.
भारतीय कर्मचाऱ्यांकडून श्वानांची सुटकाआपल्या सेवेत असलेल्या श्वानांना अमेरिकन सैन्यानं वाऱ्यावर सोडलं असताना दुसरीकडे भारतानं मात्र दूतावासात सेवा बजावणाऱ्या श्वानांची सुखरुप सुटका केली. काबूलमधील भारतीय दूतावासात तीन श्वान सेवा द्यायचे. माया, रुबी आणि बॉबी अशी त्यांची नावं. दूतावासात तैनात असलेल्या इंडो तिबेटियन सीमा पोलीस (आयटीबीपी) दलातील कर्मचाऱ्यांची ज्यावेळी काबूलमधून सुटका करण्यात आली, त्याचवेळी भारतीय हवाई दलानं या तिन्ही कुत्र्यांची सुखरुप सुटका केली.