नवी दिल्ली : अमेरिकेच्या लष्कराची शेवटची तुकडी सोमवारी रात्री अफगाणिस्तानातून बाहेर पडली त्याआधी काबूल विमानतळाच्या हँगरपाशी त्यांनी आपले अनेक हेलिकॉप्टर्स आणि सशस्त्र वाहने निकामी करून टाकली. २० वर्षे अफगाणिस्तानात अमेरिकेच्या लष्कराचा मुक्काम होता.
काबूलमधून अमेरिकेचे लष्कर विमानाने बाहेर पडल्यानंतर लगेच तालिबानी काबूल विमानतळावरील हँगरमध्ये दाखल झाले, असे पत्रकाराने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसले. अमेरिकेच्या लष्कराने मागे सोडलेल्या चिनूक हेलिकॉप्टर्सची तपासणी तालिबानी करताना त्यात दिसतात.
तथापि, अमेरिकेच्या लष्कराने विमानतळ सोडून जायच्या आधी अनेक विमाने आणि सशस्त्र वाहने तसेच हायटेक रॉकेट डिफेन्स सिस्टीम निकामी करून टाकली. सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी म्हणाले की,“काबूलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आधीच असलेली ७३ विमाने अमेरिकेच्या तुकड्यांनी तेथून निघून यायच्या आधी लष्करी वापरास अयोग्य करण्यात आली किंवा निकामी करून टाकली.”
उच्च पातळीवरील गटाच्या बैठका
अफगाणिस्तानमध्ये भारताच्या तातडीच्या प्राधान्यक्रमांवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या उच्च पातळीवरील गट लक्ष केंद्रित करीत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानात २० वर्षे राहून आपले सैन्य माघारी घेतल्यानंतरच्या परिस्थितीत भारतासाठी प्राधान्यक्रम बदलले आहेत. हा गट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार गेल्या काही दिवसांत नियमितपणे बैठका घेत आहे.